अहमदनगर

कान्हूरपठार : खंडोबाच्या दर्शनासाठी दोन लाख भाविक

अमृता चौगुले

कान्हूरपठार : पुढारी वृत्तसेवा :  'सदानंदाचा येळकोट येळकोट, जय मल्हार,'चा जयघोष करत भंडारा- खोबर्‍याची उधळण करत शनिवारी दिवसभरात दोन लाखो भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले.  आपल्या कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील कोरठण खंडोबा देवस्थानच्या यात्रोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी कोरठणला भाविकांची मोठी गर्दी झाली. बैलगाडा शर्यतीच्या घाटाचे पूजन, मानाच्या बैलगाड्याचे पूजन, मानकर्‍यांचे व घाट मालकांचा सन्मान आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. 15 वर्षांपासून बंद असलेल्या बैलगाडा शर्यत, यंदा मोठ्या उत्साहात पार पडली.

यानिमित्ताने शेकडो बैलगाड्यांनी सहभाग घेतला. सकाळी सहा वाजता खंडोबाची महाआरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. पिंपळगाव रोठा गावात मुक्कामी आलेली खंडोबा उत्सव मूर्तीची पालखी मिरवणूक सकाळी गावातून काढण्यात आली. पालखी मिरवणूक कोरठणला मंदिरासमोर आल्यानंतर पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. यावेळी भाविक पालखीवर भंडारा-खोबर्‍याची उधळण करत पालखीचे दर्शन घेत होते. यात्रेच्या दुसर्‍या दिवशी परंपरेनुसार भाविक आपल्या बैलजोड्यांना देवदर्शनासाठी घेऊन येतात. यंदाही शेकडो बैलजोड्यांना शेतकर्‍यांनी वाजत गाजत मंदिरासमोर आणून देवदर्शन घडविले. मंदिराच्या मागील बाजूस नवीन घाटात शेकडो बैलगाड्यांच्या शर्यती झाल्या. पिंप्री पेंढार (जि. पुणे) येथील मानकरी शेलार यांनी आणलेल्या मानाच्या बैलगाड्याचे देवस्थानकडून स्वागत करण्यात आले. आमदार नीलेश लंकेंच्या हस्ते शेलारांचा सन्मान, मानाच्या बैलगाड्याचे व घाटाचे पूजन करण्यात आले.

घाटासाठी जागा देणारे वाळुंज यांचा सन्मान आमदार नीलेश लंके यांनी केला. यावेळी देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, खजिनदार तुकाराम जगताप, सचिव जालिंदर खोसे, विश्वस्त राजेंद्र चौधरी, चंद्रभान ठुबे, सुरेश फापाळे, रामदास मुळे, धोंडीभाऊ जगताप, कमलेश घुले, अजित महांडुळे, सुवर्णा घाडगे, दिलीप घुले, महादेव पुंडे, माजी सरपंच अशोक घुले, सरपंच सुरेखा वाळुंज, अनिल गंधाक्ते आदींसह अनेक भाविक उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले, राजकीय जोडे बाजूला ठेवून यात्रेत सहभाग घेतल्याबद्दल सर्वाचे आभार मानतो. बैलगाडा शर्यतीच्या घाटासाठी जागा वर्ग केल्यास घाटाच्या बांधकामासाठी दहा लाखांचा निधी देऊ.तसेच, देवस्थानच्या अध्यक्षा, सरपंच महिला आहेत. समाजकारण, राजकारणात महिला सक्रिय झाल्यास गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. सायंकाळी चार वाजता सावरगाव घुले येथील मानाच्या पालखीची मिरवणूक पार पडली. रात्री मंदिराजवळ खंडोबा पालखीची छबिना मिरवणूक पार पडली. रविवारी यात्रेचा मुख्य दिवस असून, भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होईल, असा अंदाज आहे.

अध्यक्षा घुलेंचे आमदार लंकेंनी केले कौतुक

आमदार नीलेश लंके म्हणाले, देवस्थानच्या अध्यक्षा महिला आहेत त्यांनी लाखो भाविकांच्या यात्रेचे उत्कृष्ट नियोजन केल्याचे सांगून महिला काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगून देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी घुले यांचे कौतुक केले

SCROLL FOR NEXT