घारगाव : पुढारी वृत्तसेवा
जमिनीच्या व पैशाच्या वादातून एकाने दोन भावजयांची धारदार कोयत्याने वार करून निघृण हत्या केल्याची घटना अकोले तालुक्याच्या पठार भागातील बेलापूरच्या भरवस्तीत सोमवारी दुपारी घडली.
आरोपी दीर पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दत्तात्रय प्रकाश फापाळे असे आरोपीचे नाव असून, उज्ज्वला अशोक फापाळे व वैशाली संदीप फापाळे अशी मृत भावजयांची नावे आहेत.
दत्तात्रेयचा छोटा भाऊ अशोकचा कोरोना काळात मृत्यू झाला. त्याची पत्नी उज्ज्वलाशी दत्तात्रयचा शेतीच्या कारणातून वाद सुरू होता. त्यातून त्याने सोमवारी सकाळी ११ वाजता धारदार कोयता काढून तिच्यावर वार केला. यावेळी दत्तात्रयची चुलत भावजई वैशाली संदीप फापाळे सोडविण्यासाठी गेली असता दत्तात्रयने तिच्यावरही कोयत्याने वार केले. त्यात उज्ज्वला आणि वैशाली यांचा मृत्यू झाला.
बेलापूर गावात दुपारच्या सुमारास खुनाचा भयानक थरार घडल्याचे पोलिस पाटील केशव त्रिभुवन, जाचकवाडीचे माजी पोलिस पाटील शिवाजी फापाळे यांना मिळताच त्यांनी अकोले पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, हेडकॉन्स्टेल किशोर तळपे व मालुंजकर, पोलिस सुहास गोरे, विजय खाडे, किशोर फड, यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
दत्तात्रयची आई फुलाबाई प्रकाश फापाळे यांच्यासमोर हा प्रकार घडल्याचे तिनेच पोलिसांना सांगितले. घटनास्थळावरून आरोपी हातात कोयता घेऊन बदगी गावाच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणावरून समजल्याचे सांगण्यात आले. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, फापाळे कुटुंबातील उर्वरित सदस्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. घटनास्थळावर ठसेतज्ज्ञांचे पथक, श्वानपथकालाही पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.