वैजापूर : बायको नांदायला येत नसल्याने तिच्या माहेरी जावून मेहुण्याच्या अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरणानंतर हत्या करण्यात आली. घटनेनंतर आरोपीला ताब्यात घेतले. मृतदेह टाकल्याचे ठिकाण आठवत नसल्याने सदरचा मृतदेह सात दिवसांनंतर शुक्रवारी (दि.१३) गारज (ता.वैजापूर) परिसरातील मक्याच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अभिजीत राजू त्रिभुवन (रा. नायगाव, ता. श्रीरामपूर) हे आपल्या कुटुंबासह शेतमजुरी करतात. गेल्या महिन्यात त्यांची बहीण निकिता व तिचा पती राहुल पोपट बोधक (रा. चांदेगाव, ता. वैजापूर) यांच्यात घरगुती वाद झाले होते. त्यामुळे बहीण व तिचा मुलगा जयदीप हे नायगावला राहण्यास आले. शुक्रवारी (ता. ६) बोधक हा नायगावला येवून आपल्या पत्नीला बरोबर येण्यासाठी आग्रह करत होता. परंतु, तिने विरोध केल्यामुळे किरकोळ वाद झाले. यावेळी अभिजीत व त्याचे आईवडील शेतात कांदे लावण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान बोधक हा निघून गेला. मात्र, दुपारी साडेतीन वाजता बहीण निकिता व आई नायगाव येथे गेलेले असताना बोधक हा पुन्हा आला. त्याने मुलाला दुकानात घेवून जातो असे त्याची पत्नी सुश्मिता हिला सांगितले असता तिने विरोध केला. ती घरात गेल्याचे पाहून त्याने मुलगा स्नेहदिप याला बाहेर नेले. थोड्यावेळाने मुलाचा आजूबाजूला शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. याप्रकरणी सुश्मिता त्रिभुवन हिने श्रीरामपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून राहुल बोधक याने मुलाला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान, शिऊर पोलिसांना बोधक याला शनिवारी (ता.७) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने स्नेहदिप याचे अपहरण करून शनिवारी (ता. ७) सकाळी हत्या करून मृतदेह शिऊर शिवारात टाकल्याचे सांगितले. यानंतर श्रीरामपूर, शिऊर व वीरगाव पोलिसांनी श्वानपथकाला सोबत घेऊन परिसर पिंजून काढला. परंतु, मृतदेहाचा शोध लागला नव्हता. अखेर सात दिवसांनंतर शुक्रवारी (ता. १३) संभाजीनगर-मुंबई महामार्गालगत असलेल्या मक्याच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. अधिक तपास श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरी करीत आहेत.