अहमदनगर

…तर शेतकर्‍यांची गोदापात्रात जलसमाधी !

अमृता चौगुले

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  बेलपिंपळगाव फाट्यावर पीक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी बेलपिंपळगाव, पाचेगाव, घोगरगाव, पुनतगाव, बेलपांढरी, जैनपूर, साईनाथनगर, तसेच नेवासा बु मंडलमधील हजारो शेतकरी यांनी बेलपिंपळगाव फाट्यावर दोन तास रस्तारोको केला. यावेळी तालुक्यातील काही जनता तुपाशी तर काही जनता उपाशी पोटी ठेवण्याचे काम या शासनाने केल्याचा आरोप करत 12 तारखेच्या आधी जर भरपाई जर जमा झाली नाही तर गोदावरी नदीच्या पात्रात घोगरगाव ते प्रवरा संगमपर्यंत कुठेही अनेक शेतकरी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा संतप्त शेतकर्‍यांनी दिला.

बुधवारी या रास्ता रोकोत शेतकरी बैल गाडी घेऊन रोडवर उतरले होते. बेलपिंपळगावमध्ये रास्ता रोको झाला. बेलपिंपळगाव येथील सरपंच पती चंद्रशेखर गटकळ यांनी नेवासा बु . मंडलमधील अनेक शेतकर्‍यांना भेटून एकत्र करुन हा रस्ता रोको केला. विशेष म्हणजे या पीक विमा व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत मिळावी, यासाठी सर्व पक्षीय मंडळी एकत्र आल्याचे दिसले.
यावेळी नेवासा कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे व नेवासा बु. मंडल अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले. त्यात लवकरच मदत केली जाईल तसेच पीक विमा देखील मिळणार आहे जर विमा अधिकारी यांनी दिरंगाई केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे लेखी दिले. यावेळी नेवासा पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला. याप्रसंगी शेतकर्‍यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. अतिवृष्टीमुळे पीक विमा कंपनी अधिकारी व कर्मचारी यांनी गावात पंचनामा करताना गावातील शेतकर्‍यांकडून रोख रक्कम घेऊन पंचनामा केला आहे,अशी तक्रार केली. तसेच शेतकरी आंदोलनात कोणी मयत झाला, तर त्या कुटुंबातील सर्व जबाबदारी ही तहसीलदार, कृषिअधिकारी, पीक विमा अधिकारी यांच्यावर असणार आहे, असे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले.

शासनाला जाग आणण्यासाठी रास्ता रोको
नेवासा बुद्रुक उपमंडळातील सर्व गावातील शेतकर्‍यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान मिळण्यासाठी तसेच 2022-23 चा खरीप पिकविमा मिळण्यासाठी जाणून बुजून शेतकर्‍यांवर अन्याय करत असलेल्या शासनाला जाग येण्यासाठी बेलपिंपळगाव फाट्यावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जर आंदोलनाची शासन दरबारी दखल घेतली नाही, तर बारा एप्रिल रोजी गोदावरी नदी पात्रात मी व माझे सहकारी मित्र तसेच शेतकरी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ यांनी दिला.

SCROLL FOR NEXT