अहमदनगर

नगर : छत्रपती संभाजीनगरच; आंदोलने थांबवावी : उपमुख्यमंत्री फडणवीस

अमृता चौगुले

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचा उदो उदो होईल, औरंगजेबाचा नाही. औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून आंदोलन करणार्‍यांनी ती थांबवावी. जो निर्णय झाला त्याची अंमलबजावणी होईल असे सांगत नामांतरवरून आंदोलन करणार्‍यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सज्जड इशारा दिला. कर्जत येथे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा व विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. फडणवीस यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संयोजक आ. राम शिंदे, खा. डॉ सुजय विखे पाटील, आ. बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेची अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आ. मोनिका राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शांतीलाल कोपनर, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, अशोक खेडकर, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, काकासाहेब धांडे, विनोद दळवी, अनिल गदादे, सुनील यादव यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होत्या.

फडणवीस म्हणाले, अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या सर्व योजनांसाठी सरकारकडे पैसा आहे, मानसिकता देखील आहे. विरोधकांनी मात्र भ्रष्टाचार केला आणि स्वतःच्या तिजोरी भरल्या. यामुळे पैसे नाहीत असे त्यांना वाटते. परंतू राज्य सरकारकडे पैसे आहेत. राज्यातील शेतकर्‍यांसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सोलर पॅनल ही योजना राज्य सरकारने आखली आहे. तिची अंमलबजावणी सर्वत्र होणार आहे. महाविकास आघाडीचे सरकारने शेतकर्‍यांना पैसे देण्यासाठी दोन वेळा घोषणा केल्या, मात्र पैसे दिले नाहीत. आम्ही सात महिन्यांमध्ये शेतकर्‍यांना भरीव मदत केली.

अवकाळीमध्ये नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पैसे उपलब्ध करून दिले. एक रुपयांमध्ये पीक विमा उतरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. हे सरकार विद्यार्थी, महिला ,कामगार, शेतकरी, या सर्व घटकांसाठी काम करत असून डबल इंजिनचे सरकार सुसाट वेगाने विकास करत आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, पुढील तीन महिन्यात जिल्ह्यामध्ये सर्व पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहे. मतदारसंघातील बाहेरचे पार्सल आता परत पाठवा असे म्हणत नामोल्लेख टाळत मंत्री विखे यांनी आ. रोहित पवार यांच्यावर टीका केली.
आ. राम शिंदे म्हणाले, कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये जनतेला पिण्याच्या पाण्यासह सर्व सुविधा दिल्या. जी विकास कामे आम्ही मंजूर केले होते ते तीन वर्षात बंद पाडले. मात्र आता पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये विकास कामाचा प्रारंभ झाला आहे.

SCROLL FOR NEXT