अहमदनगर

संगमनेरात आ. थोरातांचे वर्चस्व कायम; थोरात गटाकडे 27 तर विखे गटाकडे 10 ग्रामपंचायती

अमृता चौगुले

गोरक्षनाथ नेहे

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या झालेल्या अटी-तटीच्या निवडणुकीत काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाची तालुक्यावरची पकड मजबूत केली आहे. निमगाव जाळी ग्रामपंचायतीवर ना. विखे गटाची एकहाती सत्ता होती. मात्र त्या ठिकाणी आ. थोरात गटाचा सरपंच जनतेने निवडून देऊन विखे यांना त्यांच्या शिर्डी मतदार संघातच जोरदार धक्का देत त्याची परतफेड केली आहे.

जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतल्यानंतर संगमनेर तालुक्यात प्रथमच 37 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. त्यात संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या घुलेवाडी ग्रामपं चायतीच्या मागील वेळी जनतेतून निवडून आलेले सरपंच सोपान राऊत यांच्यावर थोरात गटाच्या समर्थकांनीच अविश्वास ठराव आणला होता. या अविश्वास ठरावाच्या निवडणुकीत राऊत यांचा पराभव झाला होता आणि थोरात गटाचे दत्तात्रेय राऊत हे सरपंच झाले होते.

परंतु या निवडणुकीत घुलेवाडीकरांनीच ही ग्रामपंचायतची निवडणूक हातात घेतली होती. त्यामुळेच मागील वेळेचा वाचपा काढण्यासाठी संपूर्ण गावच माजी सरपंच सोपानराव त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले आणि त्यातुनच त्यांच्या सून निर्मलाताई कैलास राऊत यांना घुलेवाडीच्या जनतेनेच सरपंचपदी विराजमान केले. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे दोन गट आमने-सामने असल्यामुळे एकमेकांचे मते खाण्यात शेतकरी विकास मंडळाचे व शेतकरी परिवर्तन मंडळाच्या दोन्ही उमेदवारांना ही पराभव पत्करावा लागला.

निळवंडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या सासुबाईंनी त्यांच्या सख्ख्या चुलत जाऊ बाईचाच दारुण पराभव करत जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या. त्या विखे पुरस्कृत असल्यामुळे त्यांनी विखे गटालाच आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसचे अनेक वर्षांपासून निळवंडेत असलेली सत्ता विखे गटाच्या ताब्यात गेली आहे.

कोल्हेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मागील पंचवार्षिक निवडणुकीत जनसेवा मंडळाच्या गटाच्या ताब्यातून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्यात थोरात गटाला यश आले होते. मात्र या निवडणुकीत कोल्हेवाडीकरांनी पुन्हा एकदा स्व. भास्करराव दिघे यांच्या बाजूने कौल देत त्यांच्या सुनबाईंनाच जनतेतून सरपंच म्हणून निवडून दिले आहे.

तळेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आ. थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या विरोधात वीरभद्र जनसेवा मंडळ अशी दुरंगी लढत झाली. या लढतीत माजी सरपंच बाबासाहेब कांदळकर यांच्या सौभाग्यवती राजश्री कांदळकर यांचा दारूण पराभव करत जनसेवा मंडळाचे नेते माजी सभापती नामदेवराव दिघे यांच्या गटाच्या उषाताई रमेश दिघे या जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या. थोरात यांच्या गटाची अनेक वर्षापासून एकहाती सत्ता असलेली सत्ता उलथवून टाकण्यात विखे यांना यश आले आहे.

निमोण ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मागील वेळी थोरात गटाच्या समर्थकांनी उच्च न्यायालयात धाव घेत देशमुख यांचे सरपंचपद अपात्र ठरविले होते. मात्र निमोणकरांनी या निवडणुकीत थोरात गटाचे सरपंच पदाचे उमेदवार अनिल घुगे यांचा दारुण पराभव करत पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदीप देशमुख यांना बसविले आहे. हा थोरात गटाला धक्काच म्हणावा लागेल.

जोर्वे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मागील वेळी थोरात गटाचा सरपंच निवडून आला होता आणि सर्वाधिक जागा या विखे गटाच्या असल्यामुळे उपसरपंचपदी गोकुळ दिघे यांची निवड झाली होती. मात्र कालांतराने थोरात गटाचे सरपंच हे सुद्धा विखे गटात सामील झाले. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर विखे गटाची सत्ता होती. या निवडणुकीत सुद्धा माजी सरपंच गोकुळ दिघे यांच्या पत्नी प्रीती गोकुळ दिघे या जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.

संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील विखे यांच्या गटाची एक हाती सत्ता असलेल्या निमगाव जाळी ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर होऊन या ग्रामपंचायतीत आता आ. थोरात यांच्या गटाच्या प्रतिभा सोमनाथ जोंधळे या जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.

उंबरी बाळापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विखे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार मनीषा राहुल भुसाळ आणि परिवर्तन माजी पंचायत समितीचे सदस्य सरूनाथ उंबरकर यांच्या पत्नी सविता सरूनाथ उंबरकर तसेच थोरात गटाच्या शेतकरी विकास मंडळाकडून सुवर्णा सुभाष भुसाळ यांच्या मध्ये तिरंगी लढत झाली. या लढतीमध्ये मनीषा भुसाळ आणि सविता उंबरकर यांच्यात मते विभागली गेली. त्याचा फायदा थोरात गटाच्या सुवर्णा भुसाळ यांना झाला. त्यामुळे गटाची सत्ता उलथवून लावत थोरात गटाचा सरपंच हा जनतेतून निवडून आला आहे.

थोरातांना सावधगिरीची भूमिका घ्यावी लागेल
संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या माध्यमातून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या मतदार संघामध्येच शिरकाव करून त्यांनाच शह देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आता आगामी होणार्‍या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत आमदार थोरात यांना सावधगिरीची भूमिका घ्यावी लागणार आहे, असे चित्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून दिसून येत आहे.

SCROLL FOR NEXT