कोल्हार; पुढारी वृत्तसेवा : कोल्हार भगवतीपुरमध्ये एका सप्ताहात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोने व रोकड घेऊन पोबारा केला. घरफोड्यातील गुन्हेगारांसह झालेल्या सर्व चोर्यांचा तपास लागला नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हार भगवतीपुरातील व्यापारी व ग्रामस्थांनी आज (रविवारी) कोल्हार येथील पोलिस चौकीवर जाऊन सपोनी योगेश शिंदे यांना निवेदन देत संताप व्यक्त केला.
घरफोड्यांचा त्वरित तपास लावावा, गुन्हेगारांचा छडा लावावा, गावातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रात्री गस्त व पोलिस चौकीत नियमित पोलिस उपलब्ध असावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. कोल्हार भगवतीपूर येथे रेणुका टायर्स, संजय असावा, विजय अडागळे, राजेंद्र गुगळे व वडीतके यांच्या घरफोडी करून चोरट्यांनी रोकड रकमेसह दागिने चोरून नेले.
झुंबरलाल कुंकूलोळ कॉम्प्लेक्समधील अनेक दुचाकी चोरीस गेल्या. दर शुक्रवारी आठवडे बाजारात मोबाईल चोरीस जातात. महिलांच्या गळ्यातील दागिने पळविण्याचे प्रमाणे वाढले. यासर्व चोर्या व घरफोडींचा तपास आत्तापर्यंत लागला नाही. त्यामुळे 7-8 वर्षांपासून सुरू असलेले चोरी व घरफोडीचे सत्र थांबवून गुन्हेगारांचा छडा लावावा. गावात सुरक्षेसाठी रात्रीची गस्त वाढवा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
यावेळी झालेल्या बैठकीत अॅड. सुरेंद्र खर्डे, उद्योजक अजित कुंकूलोळ, संजय शिंगवी, उद्योजक महेंद्र कुंकूलोळ यांनी मनोगत व्यक्त केले. लोणीचे सपोनि योगेश शिंदे यांनी निवेदन स्वीकारले. गुन्हेगारांचा तपास लावण्याबाबत व कोल्हार पोलिस चौकीस नियमित पोलिस देण्याचे आश्वासन दिले.