श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. शहरास ग्रामीण भागालाही त्यांनी लक्ष्य केले आहे. श्रीरामपूर शहरालगत असणार्या शिरसगावील 11 शेतकर्यांच्या विहिरीतील इलेक्ट्रिक मोटर केबल चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये घबराट पसरली आहे. सुरेश निवृत्ती ताके (वय 59, रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर) यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. गेल्या महिनाभरापूर्वी चोरटयांनी या गावात धुमाकूळ घातला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन देवून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. यानंतर या चोर्यांना आळा बसला होता. परंतु या गुरूवारी रात्री पुन्हा शिरसगाव परिसरातील तब्बल 11 शेतकर्यांच्या इलेक्ट्रीक मोटारींच्या केबल चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
ताके यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि. 11 जानेवारी रोजी मी शेतावर शेतीच्या कामासाठी लागणारा वायर बंडल व्यवस्थित ठेवून संध्याकाळी घरी गेलो. दि. 12 जानेवारीला सकाळी शेतावर येवून मोटार चालू करायला गेलो असता माझा कॉपर वायर बंडल ठेवलेल्या ठिकाणी आढळला नाही. त्यामुळे मी त्याचा आजूबाजूला शोध घेतला असता तो आढळला नाही. आजुबाजूचा परिसर व गावामध्ये शोध घेत असताना गावातील अन्य 11 जणांच्या मोटारीच्या कॉपर केबल चोरीला गेल्याचे कळाले. त्यामध्ये विजय प्रकाश गवारे, सुभाष बाबुराव गवारे, नानासाहेब पाटीलबा ताके, अमोल ताके, अमजद कुरेशी, सतीश ज्ञानदेव गवारे, सचिन ज्ञानदेव गवारे, गणेश रावसाहेब वेताळ, राहुल अर्जुन दौंड, बबन देवराम वेताळ, नितीन सोपानराव गवारे यांच्या शेतावरील मोटारीच्या कॉपर केबल एकूण रक्कम रू. 31 हजार 500 च्या चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी शहर पोलिसात पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.
3 पानबुड्या मोटारीही गेल्या चोरीस
शिरसगाव परिसरातून तिघा शेतकर्यांच्या पानबुड्या मोटारी चोरीस गेल्या आहेत. याबाबत अनिल विनायक गिरमे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आपण शेतावर गेलो असता त्याठिकाणी स्टार्टरची वायर तुटून खाली पडलेली होती. तेव्हा विहिरीजवळ गेलो असता तेथे केबल कट करून पानबुडी चोरून नेल्याचे लक्षात आले. तेव्हा बांधालगत असलेले मल्लू दुर्गा शिंदे हेही त्यांच्या विहिरीजवळ पाहणी करत असताना त्यांना विचारले असता त्यांनीही माझीपण पानबुडी मोटार चोरीला गेल्याचे सांगितले. त्याचवेळी शेतीलगत असणारे बाळासाहेब लक्ष्मण कुदळे यांनीही माझ्या विहिरीतील मोटार चोरीला गेल्याचे सांगितले. आमच्या तिघांच्या 3 पानबुडी मोटारी आणि केबल चोरून नेल्याच्या गिरमे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीचा माल घेणारी शहरात टोळी
शहरामध्ये काही भंगारच्या दुकानामध्ये सर्रासपणे चोरीचा माल विकत घेतला जातो. नगर जिल्ह्यातून अनेक जण चोरीचा माल विकण्यासाठी श्रीरामपुरात येतात. वाहनांची चोरी करून ती भंगारमध्ये विकली जातात. अद्ययावत मशिनच्या साहाय्याने ही गाडी अर्ध्या तासाच्या आत तोडली जाते. त्यामुळे गाडीचा सुगावाही लागत नाही. मोठ्या वाहनांच्याबाबतही हा प्रकार सुरू आहे. मध्यंतरी नेवासा येथून जनरेटर चोरून भंगारमध्ये विकताना दोघांना नगरच्या पोलिसांनी पकडले होते.