मढी : पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेत रंगपंचमीच्या दिवशी कळसाला लावणारी अवजीनाथाची काठी व निवड करताना विश्वस्त मंडळातील रचनेसंदर्भात याचिका सहायक धर्मदाय आयुक्तांकडे दाखल करण्यात आली होती. देवस्थान समितीचे माजी विश्वस्त व विद्यमान विश्वस्तांमध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन वादवर तोडगा निघाला असून, वाद सामोपचाराने मिटला असल्याची माहिती मढी देवस्थानचे माजी उपाध्यक्ष सुनील सानप यांनी दिली .
सानप म्हणाले. मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी अवजीनाथांच्या काठीची मुख्य काठी म्हणून भेट देण्याची परंपरा दीडशे वर्षांपूर्वीची आहे . विश्वस्त मंडळ व काठीचे मानकरी यांच्यात गैरसमजातून एकमेकांच्या विरोधात सहायक धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. विश्वस्त मंडळ व काठीचे मानकरी यांच्यात बैठक होऊन या विषयी तोडगा निघाला आहे .तसेच विश्वस्त मंडळातील रचनेसंदर्भातील याचिका धर्मदाय आयुक्तांकेड दाखल केली होती. या मागचा उद्देश कुठल्याही कुटुंबीयांना दुखावण्याचा व त्यांच्या धार्मिक भावना भडकावण्याचा नव्हता. मागील दहा वर्षांपासून स्थानिक विश्वस्त व भाविकांतून निवड झालेले विश्वस्तांमध्ये वाद होत होते. या वादामुळे मढी देवस्थानची विकासकामे ठप्प होऊन भाविकांची गैरसोय होत होती.
मढी देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, उपाध्यक्ष सचिन गवारे, कोषाध्यक्ष बबन मरकड, सचिव विमल मरकड, सहसचिव शिवजित डोके, विश्वस्त रवींद्र आरोळे, भाऊसाहेब मरकड, डॉ. विलास मढीकर, शामराव मरकड,अर्जुनराव शिरसाठ, तानाजी ढसाळ या विश्वस्त मंडळाकडून दोन वर्षांत मढी गावचा कायापालट झाला आहे. विकासकामांमुळे भाविकांसह आम्ही समाधानी आहोत. पुढील काळात विश्वस्तांनी आपापसात वाद न करता भाविकांना सुख सुविधा देऊन सुरू असलेला विकास कायम प्रगतीपथावर सुरू ठेवावा, असे सानप यांनी सांगितले.
चर्चेतून गैरसमज दूर करून दोन्ही पक्षकारांनी वादावर तोडगा निघाल्याचे संमती पत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयात दाखल केली. त्यानुसार धर्मदाय आयुक्तांनी संमती पत्र व काही पुराव्याच्या आधारे आवजीनाथाच्या काठीला कानिफनाथांच्या मंदिरास प्रमुख कळसास भेट देण्याचा मान मान्य करून त्यानुसार ट्रस्टच्या घटनेत नोंद करण्याचा आदेश दिल्याचेे देवस्थानचे उपाध्यक्ष सानप यांनी सांगितले.