अहमदनगर

Nagar : रस्त्यावरच दुकाने थाटल्याने अपघातांचा धोका

अमृता चौगुले

खेड : पुढारी वृत्तसेवा :  खेड (ता.कर्जत) येथील कर्जत-बारामती राज्यमार्गाच्या धोकादायक वळणावर स्थानिक व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वर्दळ वाढली असून, अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बहुतांशी मासेविक्रेते रस्त्याच्याकडेला मासेविक्री करीत आहेत. त्यामुळे अनेकवेळा या धोकादायक वळणावर अपघात झाले. मात्र, सुदैवाने आजपर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु दिवसेंदिवस ही दुकाने गर्दीने गजबजू लागली आहेत. मटण-मासे खरेदीसाठी आलेले नागरिक वाहने रस्त्यावर लावून वाहतूक कोंडी करतात. वाहनांची आणि नागरिकांची ही गर्दी एकदिवस धोकादायक ठरू शकते.

भरधाव वाहनांना धोकादायक वळणाचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. गेली दोन महिन्यांपूर्वी पहाटे याच ठिकाणी इनोव्हा गाडीचा अपघात होऊन क्रॅश बॅरिअर' तुटले होते. व्यावसायिक गाळ्यांच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत एकाच जागेवर सर्व व्यावसायिकांचे नियोजन केले, तर सगळी दुकाने एकाच जागेवर थाटली जातील. वाहन पार्किंग आणि नागरिकांची गर्दीही टाळता येईल. गावाच्या मुख्य तोंडावर असलेले व्यावसाय एकाच ठिकाणी केले जातील, यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

SCROLL FOR NEXT