नगर तालुका / वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील ऑईल डेपो परिसरातून पेट्रोल- डिझेल चोरीचे प्रकार सुरूच असून, रात्रीच्या वेळी ऑईल डेपो शेजारी असलेल्या रेल्वे ट्रॅकवरील उभ्या टँकरमधून डिझेलची चोरी करणारी टोळी नगर तालुका पोलिसांनी गुरुवारी (दि.8) पहाटे पकडली. त्यांच्या ताब्यातून पाच हजार लिटर चोरीचे डिझेल, ट्रॅक्टर व त्याला जोडलेला टँकर, असा एकूण 10 लाख 62 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना बुधवारी (दि.7) रात्री 11.30च्या सुमारास एका खबर्यामार्फत माहिती मिळाली होती. आदेश बाळासाहेब शेळके (रा.अकोळनेर, ता.नगर) हा त्याचे ट्रॅक्टरला टँकर जोडून घेवून अकोळनेर ऑईल डेपो शेजारील रेल्वे ट्रॅकवर उभ्या रेल्वे टँकरमधून डिझेल चोरी करत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सहायक पोलिस निरीक्षक सानप यांनी पोलिस कर्मचारी जगदीश जंबे, धर्मराज दहिफळे, संभाजी बोराडे, कैलास इथापे यांचे पथक अकोळनेर येथे रवाना झाले .
या पथकाने अकोळनेरकडून सारोळा कासार रस्त्यावर जाताना सुमारे 1 किलोमिटर अंतरावर गेल्यावर गुरुवारी (दि.8) पहाटे 1.15 वाजता समोरून एक ट्रॅक्टर येताना उजेडात दिसला. या पथकाने गाडी थांबवून खाली उतरून ट्रॅक्टरला थांबण्याचा इशारा केला, तेव्हा ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर थांबविला.
त्यावेळी चालकाशेजारी आणखी एक व्यक्ती बसलेला होता. चालकास व त्याच्या साथीदारास खाली उतरण्यास सांगून त्यास नाव गाव विचारले असता चालकाने त्याचे नाव आदेश बाळासाहेब शेळके (वय 22 रा. अकोळनेर, ता. नगर) व त्याच्या साथिदाराने तुषार रोहिदास जाधव (वय 32 रा. अकोळनेर, ता. नगर), असे सांगितले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने, 'माझ्या साथीदाराच्या मदतीने अकोळनेर ऑइल डेपो शेजारील रेल्वे ट्रॅकवर उभ्या रेल्वे टँकरचा वॉल खोलून त्याद्वारे पाईपने ट्रॅक्टर टँकरमध्ये डिझेल आणल्याचे त्याने सांगितले. उजेडामध्ये ट्रॅक्टर टँकरची खात्री केल्यावर डिझेल असल्याचे दिसून आले.
10 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
दोघा संशयितांकडून त्यांच्याकडून सह लाख रुपये किंमतीचा एक हिरवट रंगाचा बिगर नंबरचा ट्रॅक्टर, त्यास जोडलेला एक लोखंडी टँकर, अंदाजे चार लाख 62 हजार 500 रुपये किमतीचे पाच हजार लिटर डिझेल, असा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी दोघांना नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना न्यायालयाने 10 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.