राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथील बीएसएनएलच्या कार्यालयातून चोरट्यांनी सुमारे 35 हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक वस्तू चोरून नेल्याची घटना घडली. सागर सुनील सोनवणे (वय 31 वर्ष, रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी, नगर. हल्ली रा. राहुरी बुद्रुक) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अज्ञात व्यक्तिने चोरी व लबाडीच्या इराद्याने राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथील बीएसएनएल कार्यालयाच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला.
कार्यालयातील सुमारे 35 हजार रूपये किंमतीच्या इलेक्ट्रिक वस्तू चोरून नेल्या आहेत. सागर सुनील सोनवणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक वाल्मिक पारधी हे करीत आहेत. राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत. पूर्वीच्या चोर्यांचा तपास अद्यापि लागलेला नसल्याने नव्याने चोर्या होत आहेत. पोलिसांनी या घटनांचा लवकरात लवकर तपास लावावा, अशी मागणी तालुक्यातील विविध संघटनांनी केलेली आहे.