कोळपेवाडी (नगर), पुढारी वृत्तसेवा: कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथून सराईत चोरट्यांनी घरासमोर लावलेली बुलेट गाडी चोरून नेली आहे. कोपरगाव-कोळपेवाडीच्या मुख्य रस्त्यावर मोठी लोकवस्ती आहे. या परिसरातील घरासमोर लावलेल्या दुचाकींच्या चोर्यांमध्ये वाढ होत आहे. चार दिवसापूर्वी घरासमोरून बुलेट चोरून नेली आहे. या चोरीची घटना सी. सी. टी.व्ही. कॅमेर्यात कैद झालेली आहे. तरीही पोलिसांना अद्यापि चोरट्यांपर्यंत पोहचण्यात अपयश येत आहे. आजपर्यंत चोरी झालेल्या वाहनांचा पोलिसांकडून तपास लागला नसताना पुन्हा दुचाकी चोरीचे सत्र सुरू झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठी लोकसंख्या व बाजार पेठेचे गाव असलेल्या कोळपेवाडी येथील भाऊसाहेब राधू तोरे यांनी नेहमीप्रमाणे बुलेट मोटारसायकल (एम.एच.17 सी.एफ.8000) आपल्या घराशेजारी असलेल्या वर्कशॉप समोर शुक्रवार (दि.20) रोजी लावली होती. ही दुचाकी सी.सी.टी.व्ही.फुटेजनुसार पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी चोरून नेली आहे. त्यामुळे कोळपेवाडी व पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
भाऊसाहेब तोरे यांचे कोपरगाव-कोळपेवाडी रोडवर वर्कशॉप असून वर्कशॉपच्या मागेच त्यांचे घर आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांनी आपली बुलेट मोटारसायकल वर्कशॉपच्या शटरसमोर हॅण्डल लॉक करून लावली होती. पहाटेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या तीन सराईत चोरट्यांनी आजूबाजूला कानोसा घेत कुणी जागे नसल्याची खात्री करून एकाने रस्त्यावर पाळत ठेवून दोन चोरट्यांनी बुलेटचे सराईतपणे हॅण्डल लॉक तोडून बुलेट चोरून नेली आहे.
बुलेट चोरून नेण्यासाठी हॅण्डल लॉक तोडताना चोरटे वर्कशॉपच्या पडवीत लावलेल्या सी. सी. टी. व्ही. कॅमेर्यात कैद झाले आहे. त्यांची वाहन चोरीची पद्धत पाहता हे चोरटे सराईत असून त्यांना परिसराची चांगल्या प्रकारची माहिती असावी. त्यामुळे भल्या पहाटे त्यांनी कोपरगाव-कोळपेवाडी रोडवर असलेल्या वर्कशॉप समोरून वाहन चोरून नेत पोलिसांना आव्हान दिले आहे.
बुलेट चोरी गेल्याबाबत तोरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यांना नेहमी प्रमाणे कोळपेवाडी येथे पोलिस चौकी असताना देखील कोपरगावला तक्रार दाखल करण्यासाठी जावे लागले. त्यामुळे कोळपेवाडी पोलिस चौकी फक्त देखाव्यासाठी आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पोलिस याबाबत काय भूमिका घेतात याविषयी नागरिकांत उत्सुकता आहे.
कोळपेवाडी परिसरात घडत असलेल्या चोर्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आजपर्यंत घडलेल्या चोर्यांचा तपास न लागल्यामुळे चोरांचे मनोधैर्य वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तातडीने पावले उचलून चोरांचा बंदोबस्त करावा.
– महेश कोळपे (मा. ग्रा. पं. सदस्य)