अहमदनगर

‘त्या’ बाप-लेकीची मृत्यूशी झुंज अपयशी ; पुणे येथील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा: घरगुती वादातून सासर्‍याला व पत्नीला लोखंडी पाईपने जावयाने मारहाण केल्याची घटना (दि.3) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भिस्तबाग महालाजवळ घडली होती. या घटनेतील गंभीर जखमी झालेल्या बाप व लेकीवर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी (दि.7) सकाळी दोघांचाही मृत्यू झाला आहे. किर्ती महेश भेटे (वय 22, रा. ढवणवस्ती, नगर) व विश्वनाथ केशव कसबे (वय 54, रा. ढवणवस्ती, नगर) असे मयत बाप-लेकीचे नाव आहे. या दोघांनाही महेश माणिक भेटे याने लोखंडी पाईपने मारहाण केली होती.

आरोपीची सासू रेखा विश्वनाथ कसबे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मयत किर्ती भेटे व आरोपीचा गत 4 वर्षापूर्वी विवाह झाला होता. मात्र, काही दिवसांपासून आरोपी हा किर्ती यांना दारू पिऊन मारहाण करत होता. या त्रासाबद्दल त्याच्याविरोधात तोफखाना पोलिसांत तक्रार देखील दिली होती. दरम्यान, (दि.3) पत्नी किर्ती व सासरे विश्वनाथ कसबे यांना आरोपीने भिस्तबाग महालाजवळ गाठून लोखंडी पाईपने दोघांच्याही डोक्यात मारहाण केली होती.

या मारहाणीत दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र, दोघांचाही शुक्रवारी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी महेश भेटे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

SCROLL FOR NEXT