अहमदनगर

शेवगाव तालुक्याची सुरक्षा बेभरोसे !

अमृता चौगुले

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्याची सुरक्षा बेभरोसे झाली आहे. बसस्थानकासह ग्रामीण भागात वाढत असलेले चोर्‍यांचे सत्र हे पोलिसांचे अपयश आहे. नव्याने रूजू झालेल्या पोलिस अधिकार्‍यांच्या काळात वेगळा बदल होण्याची शक्यता मावळत चालली आहे. उलट नको तेथे पोलिसांचे जास्त लक्ष केंद्रीत होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शेवगाव तालुक्याचा पोलिस विभाग सतत वादग्रस्त ठरत आहे. मध्यतंरी काही वर्षे सुरळीत गेल्यानंतर पुन्हा पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना या ना त्या कारणावरून वादग्रस्त ठरविले गेले आणि शांततेवर पाणी फेरले. आता नव्याने रूजू झालेल्या पोलिस निरीक्षकांच्या कालावधीत काही बदल होतो की काय याकडे लक्ष लागले असताना, शहरातील बसस्थानकात प्रवाशांच्या ऐवजावर चोरट्यांकडून मारले जाणारे डल्ले पाहता असुरक्षिततेचा इशारा दिला जात आहे.

त्यातच दाखल अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे आणि चापडगाव भागात वाल्हेकर वस्तीवर गुरूवारी रात्री बलात्काराची धमकी देऊन झालेली चोरीची घटना, यामुळे तालुक्याची सुरक्षितता धोक्यात येऊ पाहत आहे. हा तालुका शांततामय आहे. परंतु, लगतच्या मराठवाडा भागातील गुन्हेगार शेवगाव तालुक्यास लक्ष्य करतात. जुगार, वेशा व्यवसायाच्या माध्यमातून माहिती व टेहाळणी करीत चोर्‍या, लुटालूट असे प्रकार वाढीस लागले असून, पोलिसांचा वचक खालावत चालला आहे. शहरात झालेल्या दंगलीनंतर आता कुठेशी शांतता प्रस्थापित झालेली असताना, आता चोर्‍यांच्या घटनांनी पुन्हा सर्वांची झोप उडविली आहे. या पोलिस ठाण्यात काही खासगी दलाल शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्य, असत्य याची शहानिशा न करता पोलिस अधिकार्‍यांना खोटी माहिती देऊन त्यांचे कान भरण्याचा प्रयत्न होतो आणि एखाद्या वेळेस त्यातूनच अन्यायाचा प्रयत्न होतो. यामुळे पोलिसांवर असणार्‍या विश्वासाला तडा जात आहे. अधिकार्‍यांनी असे दलाल वेळेतच दाबले तर, पोलिसांना त्यांच्या पद्धतीने काम करणे सोईस्कर होते.

कायदा व सुव्यवस्था धोक्यात
नवीन पोलिस निरीक्षकांच्या कामाची कार्यपद्धत अद्याप उमजली नसली तरी, वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून गुन्हेगार सध्या आव्हान देत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ पाहत असून, सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT