शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : भरघाव वेगात जाणार्या वाळू वाहन चालकाने पोलिस निरीक्षकासह पोलिस पथकास चिरडण्याचा प्रयत्न केला. यात पोलिस पथक बालंबाल बचावलेे. मात्र, धडक दिल्याने पोलिसांच्या खासगी वाहनाचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी (दि.22) पहाटे मुरमी गावच्या शिवारात घडली. या वाहनाचा पाठलाग करून पोलिसांनी उमापूर येथून दोन आरोपींना अटक केली आहे.
शेवगाव तालुक्याच्या बीड सरहद्दीवर सुकळी फाटा लाडजळगाव रस्त्यावरून अनधिकृत वाळू वाहतूक होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सपोनि रवींद्र बागुल, पो.हे.कॉ. बप्पा धाकतोडे, राहुल खेडकर, बाबासाहेब शेळके, अशोक लिपणे यांचे पथक गुरुवारी पहाटे या रस्त्यावर खासगी वाहन आडवे उभे करून वाळू वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करण्यासाठी थांबले होते.
पहाटे 4.45 वाजता सुकळीमार्गे येणार्या अशोक लेलंड कंपनीच्या दहा टायर हायवा (एम.एच.23 ए.यू.1975) या वाळू वाहतूक करणार्या वाहन चालकाने पोलिसांना पाहताच आपल्या वाहनाचा वेग वाढविला व रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिस पथकाच्या वाहनास मागून धडक देऊन पसार झाला. मात्र, यावेळी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह पोलिस पथक बाजूला झाल्याने बालंबाल बचावले.
या घटनेनंतर नुकसान झालेल्या त्यांच्या खासगी इर्टिगा वाहनातून त्यांनी वाळू वाहनाचा पाठलाग सुरु केला. पाठलाग करताना बोलेरो वाहन व काही दुचाकी वाहनांनी पोलिस वाहनास अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. लाडजळगाव रस्त्यानेे बीड जिल्ह्यातील उमापूर, माळेगाव, गुळज असा पाठलाग चालू असताना वाहनातील भरलेली वाळू रस्त्यात ठिकठिकाणी टाकून पोलिस वाहन अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यातून मार्ग काढत गुळज (जि. बीड) येथे शेवगाव पोलिसांनी शोध घेतला असता, सदरचा हायवा किशोर पवार (रा. गुळज ता.गेवराई जि.बीड) हा वाळू तस्करीसाठी चालवित होता. त्याचा भाऊ बाळू पवार वाळू भरतो, तर हनुमान पवार (रा. गुळज, ह.मु. बोधेगाव, ता. शेवगाव) हा त्याच्या बोलेरो वाहनातून पोलिसांची टेहळणी करीतो. हे तिघे त्यांच्या घरासमोर वाळू वाहन उभे करून पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून शेवगाव पोलिसांनी उमापूर येथे चकलंबा पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांच्या मदतीनेे हनुमान पवार व बाळू पवार यांना अटक केली. तर, किशोर पवार पसार झाला आहे. याबाबत पो.हे.कॉ. बाबासाहेब शेळके यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.