बोटा : पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील बेलापूर ते बोटा हा रस्ता संगमनेर तालुक्याला तसेच पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. तर बोटा ते राजूर राज्यमार्ग क्रमांक 21 आहे. या परिसरातील विविध गावे वाडी वस्तीसाठी दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. यापूर्वी या रस्त्यावर निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याच्या दयनीय अवस्थेने अनेक प्रवासी बसेस बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे.
शेतकर्यांचा शेतमाल विक्रीला नेताना देखील अडीअडचणीला सामोरे जावे लागत असल्याने या परिसरातील नागरिकांना विविध शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने रस्ताच धड नसल्याने अनेक गावे विकासापासून मागासलेली असून या विभागातील गावांचा विकास खुंटला आहे.
बेलापूर ते बोटा हा रस्ता अकोले सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे अंतर्गत येत आहे. या रस्त्याचे पावसाळा सुरू होण्यापूर्वी डागडुजी होणे गरजेचे होते. परंतु ती कामे झाली नाही. यात काही किलोमीटर रस्त्याचे काम झाले. परंतु ते देखील निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे पहिल्याच पावसात समोर आले आहे. या रस्त्यावरील साईड पट्टी, साईड गटारांचे काम न केल्याने पावसाळ्यात अक्षरशः रस्त्यावरून ओढ्यासारखे पाणी वाहून गेल्याने या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्ताच वाहून गेला आहे.
या रस्त्यावरील झाडे-झुडपे यांची कटिंग न झाल्याने काही ठिकाणी झाडा -झुडपांनी रस्ताच व्यापला आहे. रस्त्यावर दिशादर्शक तसेच मार्गदर्शक फलक दिसून येत नाही. यामुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत. रस्त्यावरील येणार्या जाणार्या अनेक प्रवासी बसेस देखील बंद झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहे.
बेलापूर, चैतन्यपूर, बदगी, भक्ताचीवाडी, ब्राम्हणवाडा, जांभळे, मोघाडवाडी, भोजदरी, जाचकवाडी, पवारवाडी, म्हसवंडी, आंबी दुमाला, कुरकुटवाडी, बोटा या गावांसह अनेक वाडी-वस्तीवरील नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, प्रवासी या मार्गावरून प्रवास करताना अनेक खास्ता खात, शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करत वाहनांचे होणारे नुकसान देखील सहन करत आहे. या मार्गावरून या विभागातील शेतकर्याचे दूध, भाजीपाला, शेतमाल पुणे, मुंबई, नाशिकसारख्या मोठ्या बाजारपेठेत नेत असताना आदळ आपट करत शेतमाल वेळेत न पोहचल्याने शेतकर्यांना देखील आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दळणवळणाच्या सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक गावांच्या विकासाला खीळ बसू लागली असल्याच्या व्यथा येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी चंद्रकांत महाले, राज गवांदे संतोष शेळके, यशवंत शेळके, योगेश महाले, भगवानदादा काळे, रामा कुरकुटे, संभाजी बोडके, संदीप ढेरंगे, नितीन डुंबरे, बाळासाहेब कुरकुटे, अशोक फापाळे, नितीन डुंबरे, सुभाष गायकर, यशवंत शेळके, नवनाथ सरोदे, अजित कुरकुटे, सुरेश फापाळे, इंजी.संतोष फापाळे, राहुल रेपाळे,तुषार महाले, हौशिराम गोपाळे,लहू काळे,सुरेश खेबडे, दत्ता फापाळे,सुधीर काळे,आदी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी. वारंवार आंदोलने करून प्रशासनास जाग येणार नसेल तर भविष्यात रस्ता दुरुस्तीसाठी तसेच या मार्गाचे दुपदरीकरण करावे या मागणीसाठी मोठे जनआंदोलन सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांचे दालनात करण्यात येणार असल्याचा इशारा माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेळके,समाजसेवक भगवान काळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश फापाळे, इंजिनियर संतोष फापाळे यांनी इशारा दिला आहे.