नगर; पुढारी वृत्तसेवा : महसुली टार्गेट शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी यंत्रणा सरसावली आहे. गेल्या अकरा महिन्यांत 115 कोटी 49 लाख 23 हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. उर्वरित 34 कोटी 91 लाखांचा महसूल महिनाभरात जमा करावयाचा आहे. त्यामुळे तहसीलदार, प्रांताधिकारी व कर्मचार्यांनी सध्या वसुलीला प्राधान्य दिले आहे. राज्य शासनाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला 150 कोटी 41 लाख रुपयांचा महसूल जमा करण्याचे टार्गेट दिले. यामध्ये गौण खनिज विभागाच्या 95 कोटी 12 लाखांचा समावेश आहे.
गेल्या अकरा महिन्यात महसूल यंत्रणेला 25 कोटी 52 लाख जमीन महसूल तर 89 कोटी 96 लाख रुपये गौण खनिज महसूल गोळा झाला आहे. आर्थिक वर्ष संपायला एक महिना बाकी आहे. या महिनाभरात 34 कोटी 91 लाख 40 हजार रुपये महसूल जमा करण्यासाठी महसूल यंत्रणेची धावपळ सुरु आहे. यंदा शंभर टक्के टार्गेट पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार, प्रांताधिकारी, मंडलाधिकारी, तलाठी यांनी इतर कामे बाजूला ठेवत टार्गेट पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे.
तालुकानिहाय वसुलीची टक्केवारी
नगर 77.83, नेवासा 71.64, श्रीगोंदा 66.58, पारनेर 110,पाथर्डी 60, शेवगाव 62, संगमनेर 106, अकोले 61, श्रीरामपूर 48, राहुरी 58, कर्जत 159, जामखेड 71,राहाता 62, कोपरगाव 38.