अहमदनगर

सरपंचपदासाठीच रंगणार खरी लढत ; शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुका

अमृता चौगुले

रमेश चौधरी : 

शेवगाव तालुका : तालुक्यातील मुदत संपलेल्या चार ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. निवडणुकीनंतर उपसरपंचाची निवड होईपर्यंत प्रशासक राज राहणार आहे. या निवडणुकीत सरपंचपदासाठी अनेक इच्छुकांमध्ये चांगलेच राजकारण तापले असून, अनेक जण स्वत:च रिंगणात उतरले आहेत.

तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीपैकी खामगाव, रांजणी, प्रभुवाडगाव, सुलतानपुर खुर्द या चार ग्रामपंचायतींची मुदत गुरुवारी (दि. 10) संपली असून, निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये खामगाव ग्रामपंचायतीवर पंचायत समिती विस्तार अधिकारी एस. एस. भोंग, प्रभुवाडगाव ग्रामपंचायत पंचायत समिती विस्तार अधिकारी एस. एस. जगताप, तर सुलतानपुर खुर्द ग्रामपंचायतीवर पंचायत समिती विस्तार अधिकारी डी.बी. शेळके, रांजणी ग्रामपंचायत कृषी विस्तार अधिकारी डी.एम.भांड यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

उर्वरीत आठ ग्रामपंचायतींचा 24 नोव्हेंबरला मुदत संपत असून, त्यावरही प्रशासक राज येणार आहे. निवडणुकीनंतर उपसरपंचपदाची निवड होईपर्यंत प्रशासक राहणार आहेत.दिवसेंनदिवस ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत वाढत चालली असून, अनेकांना ती करमणूक ठरत आहे. शेतकरी, मजुर शेतीकामात व्यस्त आहेत. त्यांना सध्यातरी निवडणुकीत रस नाही; मात्र ते सांयकाळी दिवसभराच्या घडामोडी माहिती करून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

राष्ट्रवादी-भाजप आमने-सामने
गावांत राष्ट्रवादी-भाजप यांच्यात लढत होण्याची शक्यता असून वंचित आघाडीही स्वंतत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून असल्याने सदस्यांना किंमत राहात नाही याचा अनुभव आल्याने आता सरपंचपदासाठी अनेक इच्छुक पुढे आले आहेत. त्यामुळे पक्ष उमेदवारांबरोबर अपक्षांचा भरणा अधिक होणार. निवडणुकीनंतर सरपंचपदाचे अधिकार पाहता विकास कामांसाठी सदस्यांना विचारात घेतले जात नाही, हा मुद्दा अनेकांच्या जिव्हारी लागल्याने सदस्यांची उमेदवारी करण्यास सहसा कोणी धजत नसल्याने त्यांची मनधरणी चालू आहे.

महत्त्वाच्या ग्रामपंचायती
सध्या नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये मुदत संपणार्‍या तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या गावांत रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय दृष्ट्या महत्वाच्या दहिगाव-ने, अमरापूर, भायगाव, जोहरापूर, खामगाव, खानापूर, प्रभुवाडगाव, रांजनी, वाघोली, सुलतानपूर खुर्द, आखेगाव, कुरुडगाव, रावतळे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर करण्यासाठी अनेक इच्छुकांनी गाठी-भेटीची सुरुवात केली आहे. गावात झालेला विकास, तर गावातील दुर्लक्षीत विकास या मुद्याबरोबर आपण काय करणार? या चर्चेतुन मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न होतो आहे.

SCROLL FOR NEXT