अहमदनगर

नगर : प्रेमी युगुलांचा ‘सैराट’पणा वाढतोय ! प्रेमाच्या आणाभाका घेत पळून जाण्याचे प्रमाण चिंताजनक

अमृता चौगुले

वाळकी : ज्ञानदेव गोरे  :  जिल्ह्यात सध्या शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुला-मुलींचे प्रेम प्रकरणातून 'सैराट' होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्हाभरातून दररोज कुठून ना कुठून मुली पलायन करण्याच्या घटना घडत आहेत. नगर तालुक्यातील ग्रामीण भागातही प्रेमी युगलांच्या पलायन होण्याच्या घटना वाढल्या आहेत. सोशल मीडियाच्या अतिवापराचा हा परिणाम असल्याचे निरीक्षण पोलिस यंत्रणेने नोंदविलेले आहे. प्रेमी युगलांचे सैराट होण्याचे लोण ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पोहोचले असून पालकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. यासंदर्भात पालकांनी आता अतिशय जागरूक राहणे गरजेचे झाले आहे.

नगर तालुक्यातून प्रेमाच्या आणाभाका घेत घरातून मुला मुलींचे सैराट होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः ग्रामीण भागात प्रेमीयुगलांचे पलायन होण्याचे प्रमाण वाढले आहे . तालुक्यातून जवळपास 27 लैला मजनुचे जोडपे प्रेमाच्या आणाभाका घेत सैराट झाले आहेत. यातील 22 मुलींचा शोध घेऊन पोलिसांनी त्या मुलींना कुटुंबियांच्या सुखरूप हवाली केले आहे. यामध्ये 19 जणांवर गुन्हे दोषारोप दाखल करण्यात आले असून, 8 प्रकरणांचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. पाच मुलींचा अद्यापी शोध लागला नाही .

शहर व उपनगरात मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवत पळवून नेण्याच्या घटना वाढत आहे. या प्रेम प्रकरणांचे लोण आता ग्रामीण भागात पसरले आहे. साधारणपणे 14 ते 17 वयाच्या शाळकरी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फूस लावून पळवून नेण्याच्या अनेक घटना नगर शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. नगर तालुक्यातील मठपिंप्री, आंबिलवाडी, निंबोडी, वाळकी या गावांमध्ये अलीकडच्या काळात अशा घटना घडल्या आहेत. या बरोबरच जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये दररोज पोलिस ठाण्यात तक्रारी येत आहेत. ही बाब पालकांची चिंता वाढविणारी आहे.

नगर तालुक्यातून वर्षभरात जवळपास 27 लैला मजनूंच्या जोडप्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत धूम ठोकलेल्या घटनांची पोलिस दप्तरी नोंद झाली आहे. यामध्ये शाळेतूनच धूम ठोकण्याच्या घटना अधिक आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींचे प्रेमाच्या जाळ्यात फसण्याचे प्रमाण अधिक आहे. पोलिसांना या लैला मजनूंचा अथक प्रयत्नाने शोध लावला असला तरी आणखी आठ प्रकरणांचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

अशा घटना कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळापासून मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कोरोना काळात शाळा महाविद्यालये बंद होती. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी सर्वच पालकांनी आपल्या मुला मुलींना स्मार्ट फोन घेऊन दिले होते. स्मार्ट फोनच्या वापराबाबत व सोशल मीडियाच्या वापराबाबत अनेक पालक अनभिज्ञ असल्याने मुले-मुली सोशल मीडियावर काय करतात, हे त्यांना समजत नाही आणि यातूनच असे प्रकार घडत असल्याचे निरीक्षण या दाखल गुन्ह्यांचा तपास करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांनी नोंदविले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी अधिक सतर्क राहून आपल्या मुलांकडून सोशल मीडिीयाचा गैरवापर तर होत नाही ना? याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

बदनामीच्या भीतीने तक्रारीस टाळाटाळ

आपली बदनामी नको, यासाठी अनेक घटनांची पोलिस दप्तरी नोंद करण्यास टाळाटाळ झाली असल्याचे एका गावात घडलेल्या घटनेतून दिसले. आपल्या मुला-मुलींनी केलेल्या 'प्रतापा'चा गवगवा नको, यासाठी सामंजस्याने तोडगा काढून ही प्रकरणे मिटविली गेली आहेत. अशा प्रकरणाची संख्या अधिक आहे.

अनेकींनी रंगविलेली स्वप्ने भंगली

प्रेमाच्या प्रवाहात सैरभैर होत भविष्यात पुढे वाढून ठेवलेल्या घटनांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रेमात बुडालेल्या मुलींकडून भावनेच्या भरात जोडीदार कसा आहे, भविष्यात आपले जीवन सुखी होईल का? याकडे दुर्लक्ष होत आहे. काही दिवसांनंतर आपल्या रंगविलेल्या स्वप्नाचा भंग झाल्याचे प्रकार ही तपासातून समोर आले आहेत

आपली मुले मुली शाळेत, महाविद्यालयात जातात का, त्यांच्या मित्र-मैत्रिणीची वर्तणूक कशी आहे, याकडे पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर नको ते पाहण्यामुळे असे प्रकार वाढत आहेत. आता शालेय अभ्यासक्रम ऑफलाईन झाले आहेत. त्यामुळे मुलामुलींच्या हाती जास्तवेळ मोबाईल देऊ नये. आई-वडिलांनी आपल्या मुलामुलींकडे लक्ष दिल्यास या घटनांना पायबंद बसेल.
                         – सपोनि राजेंद्र सानप,  नगर तालुका पोलिस ठाणे

सोशल मीडिीयाच्या अतिवापराने तरुण पिढी भरकटत चालली आहे. अल्पवयीन मुलींना विविध प्रकारचे मनाला भावतील, असे दाखविले जात आहे. आई-वडिलांनी आपल्या मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्यात होत असलेला बदल लक्षात घेऊन त्यावर स्वतः उपाययोजना करणे गरजेचे आहे .
                      – सपोनि युवराज आठरे, एमआयडीसी पोलीस ठाणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT