नगर : पुढारी वृत्तसेवा : शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय आणि अहमदनगर शहरासाठी स्वतंत्र अपर तहसील कार्यालय व्हावे, असे दोन प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले होते. शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होऊन कामकाज सुरूही झाले; मात्र, कित्येक वर्षांपासून मागणी होत असलेला नगर येथील अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव शासनस्तरावर धूळ खात पडून आहे. अहमदनगर तालुक्यात महापालिका असून, या तालुक्याची लोकसंख्या 6 लाख 84 हजार आहे. यामध्ये नगर शहरातील 4 लाख 28 हजार 182 लोकसंख्येचा समावेश आहे. वाढती लोकसंख्या, तालुक्यातील वाढते नागरीकरण आणि राजशिष्टाचारविषयक वाढते कामकाज त्यामुळे तालुक्यातील जनतेला आवश्यक सेवा पुरविणे अवघड झाले आहे.
महापालिका असलेल्या ठिकाणी नाशिक आणि औरंगाबाद शहरांत अपर तहसील कार्यालये निर्माण करण्यात आली आहेत. याच धर्तीवर नगर शहरासाठी स्वतंत्र अपर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी कित्येक वर्षांपासून जनतेकडून होत आहे. राधाकृष्ण विखे पाटील महसूलमंत्री झाल्यानंतर पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 22 नोव्हेंबर 2022 रोजी शासनाकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. याच कालावधीत शिर्डी येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.
शिर्डी येथील नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरी मिळून ते कार्यालय नुकतेच जोमात सुरूही झाले. त्यामुळे संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहुरी, राहाता व कोपरगाव या सहा तालुक्यांतील जनतेला कामासाठी आता अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. 'शिर्डीचं चांगभलं झालं, पण नगरचं काय झालं, असा प्रश्न नगरकर विचारत आहेत…
शहरातील जनतेत तीव्र नाराजी
अहमदनगर शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नगर तहसील कार्यालयात होणारी गर्दी तसेच अपुरा कर्मचारी वर्ग त्यामुळे महसूलची कामे मार्गी लागण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत स्वतंत्र तहसील कार्यालय तत्काळ निर्माण करण्याची गरज आहे. प्रस्ताव पाठवून दहा महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, अद्याप नवीन स्वतंत्र अपर तहसील कार्यालय सुरू होत नसल्यामुळे अहमदनगर येथील जनतेत तीव्र नाराजी आहे.
नवीन स्वतंत्र कार्यालयाचे कार्यक्षेत्र
स्वतंत्र नवीन अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात भिंगार, केडगाव, सावेडी, भिस्तबाग, नालेगाव, मोरचूदनगर, माळीवाडा, चौराहा खुर्द व बुद्रुक, नागापूर, बोल्हेगाव व नवनागापूर या महसूल मंडळांचा समावेश असेल. या कार्यालयासाठी एक अपर तहसीलदार, दोन नायब तहसीलदार, चार अव्वल कारकून, सहा महसूल सहायक अशा एकूण 14 अधिकारी-कर्मचार्यांचा प्रस्तावात समावेश आहे. हे नियोजित कार्यालय सावेडी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.