अहमदनगर

नगर : जिल्हा बँकेतील फुटीरांची नावे पक्ष करणार जाहीर!

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील फुटीर संचालकांना पक्षातून निलंबित करण्यात यावे, तसेच कुचकामी ठरलेले जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची पदावरून त्वरीत हकालपट्टी करावी, अशी मागणी नगरच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी वरिष्ठांकडे केल्याची माहिती युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी दिली. दरम्यान, दोन दिवसांत पक्षनिरीक्षक अंकुश काकडे हे फुटीरांची नावे जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार, कोळगे यांनी ही माहिती दिली. जिल्हा बँक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अजित पवार व बाळासाहेब थोरात यांनी बँकेच्या सर्व 14 संचालकांची विश्रामगृहावर बैठक घेतली त्यावेळी सर्वांना स्वातंत्र्य दिले होते. दोन-तीन संचालक वगळता सर्वांनीच पक्ष सुचवेल ते नाव मान्य असल्याचे सांगितले होते.

दुसर्‍या दिवशी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी संचालकांची बैठक घेत चंद्रशेखर घुले यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर सर्व संचालक हे बँकेत गेले. मात्र त्या ठिकाणी पाच संचालकांनी पक्षाचा विश्वासघात केल्याने घुले यांचा पराभव झाला. जिल्हा बँक निवडणुकीतील घडामोडीचा गोपनिय अहवाल पक्षाचे नेते शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांना पक्षनिरीक्षक काकडे हे शुक्रवारी संध्याकाळी देणार आहेत. तसेच दोन दिवसांत काकडे हेच फुटीरांची नावेही जाहीर करणार असल्याचे कोळगे यांनी सांगितले.

'ते' दोन संचालक रात्री दादांकडे ..!
फुटीरांपैकी दोन संचालक त्याच रात्री पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे गेली होती. यातील एकाने अगोदरच कबुली दिल्याचा गौप्यस्फोट कोळगे यांनी केला.

पराभवाचे खापर फाळकेंवर!
कर्जतमध्ये ज्या पद्धतीने राम शिंदे यांना विरोध करायला हवा, तसा फाळके करत नाहीत. त्यातच जिल्हाध्यक्ष या नात्याने बँकेच्या निवडणुकीतील अंतर्गत घडामोडी त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे कळवायला हव्या होत्या, मात्र त्यांनी ते केले नाही. बँकेच्या निवडणुकीच्या दिवशीही ते फिरकले नाहीत. त्यामुळे फाळके यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी पक्षनेतृत्वाकडे केल्याचे कोळगे व पवार यांनी सांगितले. अकोले, श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदा चर्चेत
बँकेच्या निवडणुकीत काही संचालक फुटीर झाल्याने अकोले, श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात कार्यकर्ते जाब विचारत आहेत. निदर्शने केली जात आहे, घोषणाबाजी होत आहे. सर्वत्र 'त्या' संचालकांची पक्षातून हकालपट्टीचीही मागणी केली जात असल्याचेही पवार, कोळगे यांच्याकडून आवर्जून सांगण्यात आले.

SCROLL FOR NEXT