नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे नगरसेवक व स्थानिक पदाधिकार्यांनी वारंवार मनपा अधिकार्यांना धारेवर धरले. त्यामुळे मनपाने पहिल्याच संस्थेला तीन महिन्यासाठी मुदत वाढ दिली होती. आता त्या संस्थेची तीन महिन्यांची मुदत संपली. एकीकडे मोकाट कुत्र्यांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना पुन्हा कुत्रे मोकाट झाले. नगर शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. कुत्र्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना रस्त्याने पायी चालणे मुश्किल झाले आहे. शाळकरी मुलांना कुत्र्याने चावा घेतल्याच्याही अनेक घटना शहरात घडत आहेत.
स्थायी समिती, सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांवरून अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले होते. मोकाट कुत्रे पकडण्याचा आणि निर्बिकरण करण्याचा ठेका पुण्याच्या पीपल्स फॉर अॅनिमल संस्थेला देण्यात आला होता. त्या संस्थेचा करार संपल्यानंतरही मनपाने दुसरी निविदा केली नव्हती. नगरसेवकांनी स्थायी समिती व सर्वसाधार सभेत धारेवर धरल्याने मनपा अधिकार्यांनी घाई-घाईत त्याच संस्थेला तीन महिन्यांची मुदत वाढ दिली होती. आता त्या संस्थेची तीन महिन्याची मुदत वाढ संपली असून, संस्थेने तसे पत्र महापालिकेला दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या हद्दीतील कुत्रे मोकाट झाले. दरम्यान, मोकाट कुत्रे पकडणे व निर्बिकरण करणे याबाबच ठेका नवीन संस्थेला देण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. लवकरच नवीन संस्थेला काम देण्यात येईल, असे मनपा अधिकार्यांनी सांगितले.