अहमदनगर

पाथर्डी : लम्पी बाधित जनावरे सोसतायेत मरणयातना !..

अमृता चौगुले

करंजी :  पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यात लम्पी बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, तालुक्यातील पशुवैद्यकीय विभाग देखील या आजारावर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. गावातील बळीराजा लम्पी बाधित क्वारंटाईन केंद्रात सध्या 100 जनावरांवर उपचार सुरू आहेत. तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या केंद्रात आतापर्यंत दीडशे जनावर बरे होऊन शेतकर्‍यांनी आपल्या घरी नेले आहेत. दहा जनावरांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यूही झाला आहे. लम्पी बाधित जनावरांच्या पायाला जखमा होत असून, या जखमांमुळे जनावरांना उभे राहणे मुश्किलीचे ठरत आहे.

त्यामुळे अनेक जनावर जमिनीवर आडवी झाली आहेत. बळीराजा क्वारंंटाईन केंद्रामध्ये या बाधित जनावरांवर उपचार करण्यासाठी दोन पशुवैद्यकीय अधिकारी, तसेच पाच कर्मचारी अहोरात्र उपचार करीत आहेत. या केंद्रात काही बाधित जनावरांची प्रकृती खरोखरच अस्वस्थ करणारी आहे. या केंद्रातील जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. हिरवागार चारा त्याचबरोबर पशुखाद्य मदत स्वरूपात मिळाले, तर या आजारावर बाधित जनावरे निश्चित मात करू शकतात.
लम्पी आजाराने गावरान जनावरांवरच प्रामुख्याने आक्रमण केल्याने अनेक सर्वसामान्य शेतकर्‍यांची गावरान जनावरे सध्या या आजारामुळे बाधित होऊन मृत्यूशी झुंज देत आहेत.

शेतकर्‍यांनी मोकळ्या जागेत जनावरांना चरण्यासाठी सोडू नये डबक्यात जनावरांना पाणी पिण्यासाठी नेऊ नयेत, तसेच पुढील काही दिवस जनावर गोठ्यातच बांधून ठेवावीत. गोठ्यात नेहमी जंतूनाशक फवारणी करावी आजारी जाणारांना स्वतंत्र जागेत बांधावे व पशुवैद्यकीय विभागाशी तत्काळ संपर्क साधावा.
                                                   – राकेश बडे, पशुवैद्यकीय अधिकारी

तिसगाव येथे तीन महिन्यांपासून बळीराजा क्वारंटाईन सेंटर सुरू केले असून शेतकर्‍यांचे पशुधन जगावे हा या मागचा हेतू आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून बाधित जनावरांवर नियमित उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर जनावरांना चार्‍याची पाण्याची व पशुखाद्यासारखी मदत दानशूर व्यक्तींनी केली, तर या जनावरांमधील प्रतिकारशक्ती निश्चितपणे वाढेल.
                                               – शरद मरकड, क्वारंटाईन केंद्र प्रमुख

SCROLL FOR NEXT