अमोल गव्हाणे :
श्रीगोंदा : आढळगाव ते जामखेडपर्यतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. आढळगाव ते जामखेडपर्यतचा पूर्ण रस्ता उकरून ठेवल्याने या रस्त्यावरून प्रवास करणार्या प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. संबधित कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे काम पाहणारे अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे या भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
न्हावरा ते आढळगाव शिवारापर्यत पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम संबंधित एजन्सी ने प्रवाशाना कुठलाही त्रास होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली. रस्त्याच्या एका बाजूने एक किलोमीटर खोदकाम करून त्यानंतर मुरुमीकरण, नंतर काँक्रीटीकरण अन दुसर्या बाजूने वाहतुकीसाठी रस्ता अले कामाचे नियोजन केले होते.
आता एजन्सीने नियमांची पायमल्ली करीत आढळगाव ते जामखेडपर्यतचा रस्ता खोदून त्याचे किरकोळ ठेकेदाराकडून मुरुमीकरनाचे काम करून घेतले. मुरुमीकरण वेगवेगळ्या ठेकेदारांनी केल्याने त्याचा कामाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा रस्ता खोदून ठेवल्याने रस्त्याच्या आजूबाजूला राहणार्या लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतुकीमुळे प्रचंड धूळ उडून ती आजूबाजूच्या परिसरात उडते अन त्याचाच जास्त त्रास होतो आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम महसूल विभागाने बंद ठेवण्यास सांगितले होते.जवळपास दोन महिने काम बंद राहिल्याने प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत होता. दोन महिने काम बंद ठेवून महसूल विभागाने नेमके काय साध्य केले अन पुन्हा काम सुरू करण्याबाबत कशी उपरती सूचली. हा सध्या आढळगाव परिसरात चर्चेचा विषय ठरू लागला आहे. यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, हेही शोधण्याची गरज आहे. काँक्रीटिकरण करण्याचे काम कर्जत अन जामखेड तालुक्यात सुरू असताना श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्याचे खोदकाम का केले? अशा पद्धतीने प्रवाशांना वेठीस धरून किंबहूना त्यांच्या जीवाशी खेळून संबधित एजन्सी व राष्ट्रीय महामार्ग विभागाला नेमके काय साध्य करायचे आहे.
या रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी खरे तर लोकप्रतिनिधीकडून पाठपुरावा होणे गरजेचे आहे.आमदार बबनराव पाचपुते, प्रा.राम शिंदे, आ. रोहित पवार या भागाचे आमदार आहेत. रस्त्याच्या या ढिसाळ नियोजनाबाबत त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतल्याचे दिसत नाही.
आढळगाव भागात रस्ता उकरला गेल्याने या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीच्या अधिकार्यांना वारंवार सांगूनही ते रस्त्याच्या उपाययोजनेबाबत कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने आम्ही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
आढळगाव बसस्थानक परिसरातील रस्ता उकरण्यास नागरिकांचा विरोध आहे. रस्त्यावरील धुळीचा मोठा त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे. काँक्रीटीकरण करणारे मशीन कर्जत तालुक्यात असताना बसस्थानक परिसरातील रस्ता उकरण्याचा घाट का? रस्त्याचे काँक्रीटीकरण करणारे मशीन या भागात आना अन मगच रस्ता उकरण्यास सुरुवात करा.
-सत्यवान शिंदे, स्थानिक नागरिक