अहमदनगर

नगर शहरातील बड्या थकबाकीदारांची इज्जत चव्हाट्यावर

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहरातील मालमत्ताधारकांकडे अद्याप 210 कोटींची थकबाकी आहे. त्यात पाच लाखांच्या पुढील थकबाकीदारांची नावे चौकाचौकात जाहीर करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने पाच लाखांची आणि त्यापुढील थकबाकी असणार्‍या सुमारे 225 थकबाकीदारांची नावे चौकाचौकात फ्लेक्स बोर्डवर झळकावले आहेत. त्यामुळे अनेक बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेने शास्तीमध्ये 75 टक्के सूट देऊनही नगरकरांनी कर भरण्याकडे पाठ फिरविली. महापालिकेला अपेक्षित वसुली झाली नाही. अद्यापही रिकामे भूखंड, इमारती, हॉटेल, मोठे व्यावसायिक यांच्याकडे सुमारे 210 कोटींची थकबाकी आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी वसुलीला प्रतिसाद मिळत नसल्याने पाच लाखांच्या पुढील थकबाकीदारांची नावे चौकाचौकात झळकविण्याचा निर्णय घेतला होता. तसे आदेश प्रभाग समिती कार्यालयांना दिले होतेे. त्यात कर वसुली सतत्य रहावे, यासाठी आयुक्तांनी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाला उपायुक्तांची नेमणूक केलेली आहे. शास्ती माफीत सूट देऊनही मालमत्ता थकबाकीदारांनी करभरणा केला नाही. आयुक्तांनी वारंवार आवाहन करूनही कर भरण्याकडे मालमत्ताधारक दुर्लक्ष करीत आहेत. अखेर आयुक्त डॉ. जावळे यांनी थकबाकीदारांचे नावे चौकाचौकात फलकावर जाहीर करण्याचे आदेश वसुली विभागाला दिले. त्यानुसार वसुली विभागाने एक लाख ते पाच लाखांच्या पुढे थकबाकी असणार्‍या सुमारे 225 थकबाकीदारांची नावे झळकावली आहेत. त्यामुळे अनेक बड्या हस्तींची नावे थकबाकीदारांच्या यादीत असल्याने सामान्य नगरकर अवाक् झाले आहेत.

SCROLL FOR NEXT