अहमदनगर

नगर : जिल्ह्यात ‘ऑक्सिजन’ प्रकल्पच अत्यवस्थ!

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या भीषण संकटात ऑक्सिजनअभावी दररोज शेकडो मृत्यू सुरू असताना, संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता शासनाने हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे 14 प्रकल्प हाती घेतले. त्यासाठी कोट्यवधीचा खर्च केला. मात्र, आज जिल्ह्यातील 12 पेक्षा अधिक प्रकल्पांचे लाखोंचे वीजबिल थकलेले आहे. जिल्हा रुग्णालयाकडून पाठपुरावा करूनही शासनाकडून अनुदान मिळाले नाही, तर दुसरीकडे थकबाकीही वाढल्याने महावितरणने या प्रकल्पांचा वीज पुरवठा बंद करून 'शॉक' दिला आहे. त्यामुळे आज हाच महत्त्वाकांक्षी प्रकल्प शोभेची वास्तू बनल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय आणि 23 ग्रामीण रुग्णालये आहेत. मध्यंतरी कोरोनात काळात ऑक्सिजन बेडचे निर्माण झालेले संकट पाहता शासनाकडून 12 ग्रामीण रुग्णालये आणि 2 उपजिल्हा रुग्णालयांत हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभे केलेले आहेत. यामध्ये अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, नगर, श्रीगोंदा, जामखेड, पारनेर आणि राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामीण रुग्णालयात आणि कर्जत व पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात हे प्रकल्प घेतलेले आहेत.

प्रतिप्रकल्पाला 1.53 कोटींचा खर्च
हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने मोठा खर्च उचलला. शासन तिजोरीतून या एका प्रकल्पासाठी तब्बल 1.53 कोटींचा खर्च झाला आहे. अशाप्रकारे 21.42 कोटींचा खर्च झाल्याचे सूत्रांकडून समजले.
दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात 'आरोग्य'वर मोठी चर्चा झाली. मात्र, त्यात थकित वीजबिलामुळे बंद पडलेले ऑक्सिजन प्रकल्प कोणाच्याही निदर्शनास आले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घातल्यास नक्कीच वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागेल, असाही आशावाद नगरकरांमधून व्यक्त केला जात आहे.

11 प्रकल्पांचा वीजपुरवठा बंद
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे वीजबिल थकल्याने महावितरणने तगादा सुरू केलेला आहे. जिल्ह्यात 14 प्रकल्पांचे सुमारे 30 कोटींच्या आसपास बिल थकलेले आहे. त्यामुळे यापैकी जामखेड आणि पाथर्डी वगळता अन्य 12 ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत हे प्रकल्प शोभेची वास्तू बनल्या आहेत. अनेक दिवस प्रकल्प बंद राहिला, तर यातून मोठे नुकसानही होणार आहे.

दिवसाला 650 सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती
शासनाने ग्रामीण रुग्णालयात उभारलेल्या एका प्रकल्पातून दिवसाला 650 सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती केली जाऊ शकते. त्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी म्हणून पुढे आला होता. अशाप्रकारे 14 ग्रामीण रुग्णालयांतील प्रकल्पांतून दिवसाला सुमारे 2600 सिलेंडरची ऑक्सिजन निर्मिती शक्य होणार होती. त्यातून रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा खासगी रुग्णालयात नेण्यापेक्षा ग्रामीण रुग्णालयात त्याला प्राथमिक स्वरुपात ऑक्सिजन सुविधा देण्यासाठी हा प्रकल्प लक्ष्यवेधी ठरणारा होता.

दरमहा 2 लाखांचे वीजबिल!
एका प्रकल्पाला दरमहिन्याला साधारणतः 2 लाखांचे वीजबिल आकारले जाते. या प्रकल्पांच्या वीजबिलापोटी शासनाकडून विशेष तरतूद केली जाते. मात्र, एप्रिल 2022 पूर्वीपासून वीजबिलाचे अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे थकीत वीजबिलाचा आकडा वाढलेला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT