अहमदनगर

नगर : वनमित्र पथकाच्या सतर्कतेमुळे वनसंपदा वाचली !

अमृता चौगुले

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील इमामपूर घाटातील डोंगराला लागलेला वणवा वनमित्र पथकाच्या सदस्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे वेळीच विझविण्यात आला. त्यामुळे वन विभागाची सुमारे हजारो हेक्टर क्षेत्राची वनसंपदा वाचली आहे.
बुधवार दि. 18 रोजी सायंकाळच्या सुमारास इमामपूर घाटातील सर्व्हे नंबर 59 मध्ये मोठा वणवा लागला होता. वणवा लागल्याची माहिती जेऊर येथील वनमित्र पथकाला मिळताच पथकाचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वणव्याचे रौद्र रूप व घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाला संपर्क साधण्यात आला.

वनमित्र पथकाचे सदस्य मायकल पाटोळे, सनी गायकवाड, माजी सरपंच बंडू पवार, सरपंच भीमराज मोकाटे, रघुनाथ पवार, हर्षल तोडमल, आकाश तोडमल, सुरज पवार यांनी झाडांच्या फांद्यांच्या साह्याने वणवा विझवला. वणवा विझवण्यासाठी हॉटेल लिलीयम पार्कचे चालक विजय भागवत, व्यवस्थापक अण्णासाहेब बाचकर, राजकुमार तेजम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वन विभागाचे वनरक्षक श्रीराम जगताप, नेवासा वनविभागाचे चांगदेव ढेरे तसेच राहुरीचे बबन जाधव व वन कर्मचार्‍यांनी ही घटनास्थळी येऊन आग विझविण्यासाठी मदत केली.

वणवा पेटलेल्या क्षेत्राशेजारीच राहुरी, नगर तसेच नेवासा तालुक्यातील मोठे वनक्षेत्र आहे. त्यामुळे वणवा वेळीच आटोक्यात आला नसता तर हजारो हेक्टर वनसंपदा नष्ट झाली असती. जेऊर येथील वनमित्र पथकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी वनसंपदा वाचल्याने त्यांच्या कार्याचे जेऊर पंचक्रोशीतून कौतुक करण्यात येत आहे.फ

इमामपूर घाटात वणवा लागल्याची माहिती समजतात वनमित्र पथकाचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनमित्र पथक व हॉटेल लिलीयम पार्कचे चालक, कर्मचारी यांनी वेळीच वणवा आटोक्यात आणल्याने हजारो हेक्टर वनसंपदा वाचली आहे.
                                             – मायकल पाटोळे , सदस्य वनमित्र पथक

सद्यस्थितीत डोंगरात गवत वाळलेले आहे. वन विभागाच्या वतीने जाळ रेषा मारण्याचे काम सुरूच आहे. शेतकर्‍यांनी डोंगराच्या कडेला आपले बांध जळू नयेत. तसेच वन विभागाच्या हद्दीत, वनसंपदेला धोका पोहोचेल अशा ठिकाणी धूम्रपान करू नये. अन्यथा कारवाई करण्यात येईल.
                                                – श्रीराम जगताप, वनरक्षक, नगर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT