नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता पदी आदेश झालेल्या एस.आर वारे यांनी 15 दिवस उलटूनी पदभार घेतला नव्हता. त्यामुळे याविषयी वेगवेगळी चर्चा सुरू असतानाच, दोन दिवसांपूर्वी वारे यांचा हा बदलीचा आदेश अंशत बदलून त्यांना झेडपी ऐवजी आता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, नगर येथे कार्यकारी अभियंता म्हणून बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता हे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या पदावर बुलढाण्यातून एस.आर वारे यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाला संजीवनी मिळतानाच जलजीवनलाही आणखी गती येणार होती.
मात्र 15 दिवस होऊनही वारे हे झेडपीत पदभार घेण्यासाठी आलेले नव्हते. त्यामुळे नेमके पाणी कुठं मुरतयं, याविषयी राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा वारे यांच्या संदर्भात नवा आदेश निघाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट जीवन प्राधिकरण विभागाचे मुख्य प्रशासकीय सचिव दिपाली देशपांडे यांनी एक आदेश काढून एस. आर. वारे यांच्या पूर्वीच्या नियुक्तीत अंशत बदल करून त्यांना जि.प. पाणी पुरवठा ऐवजी महाराष्ट जीवन प्राधिकरण, नगर येथील रिक्त असलेल्या कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती देत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे झेडपीत दाखल होणारे वारे हे अवघ्या 15 दिवसांतच एमजीपीकडे कसे वळविण्यात आले, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.