अहमदनगर

राहुरी : शिंदे-फडणवीस शासनाचा अंत समिप : आ. तनपुरे

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : निळवंडे कालव्याचे काम ठप्प आहे, हे धक्कादायक आहे. विकासकामांच्या ग्रामविकास निधीला थांबा देत कायद्याचा वापर जनसामन्यांना त्रास देण्यासाठी करणार्‍या शिंदे-फडणवीस शासनाचा अंत लवकरच होणार आहे. राज्याला पुन्हा विकासकामांच्या माध्यमातून जनसामन्यांचा उद्धार होण्यासाठी महाविकास आघाडी शासनाची सत्ता आगामी तीने ते चार महिन्यात पहावयास मिळणार असल्याचे सुतोवाच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. चिंचविहिरे येथे वाढीव पाणी योजना व स्मशानभूमीतील विकासकामांचा शुभारंभप्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती पठारे होत्या.

उपसरपंच जयराम गिते, विजय नरोडे, राजेंद्र नालकर, दगडू गिते, हुसेन पठाण, बाळासाहेब नरोडे, एकनाथ नालकर, साहेबराव पठारे, राजेंद्र गरुड, नामदेव पानसंबळ, सुखदेव नरोडे, शब्बीर पठाण आदी उपस्थित होते. आमदार तनपुरे म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील नवीन पाणी योजनांसाठी दीड वर्षे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे, मिरी-तिसगाव सारख्या मोठ्या योजनेसह चिंचविहिरेची पाणी योजना मार्गी लागली आहे. अतिवृष्टीचे पंचनामे झाले. परंतु शासनाकडून ढबू निधी मिळालेला नाही. नगर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आले. हे दुर्देवी आहे. याबाबत विधानसभेत आवाज उठविणार आहे. निळवंडेच्या कालव्यांना भाजपाच्या काळात पाच वर्षात जेवढा निधी मिळाला.

तेवढा महाविकास आघाडीने प्रत्येक वर्षी कोरोना महामारी असताना दिला. कालव्यांची कामे वेगाने चालू होती. त्यावेळी उजव्या कालव्याचा शेवटचा भाग बंद जलवाहिनीचा नको, खुला कालवा करावा. अशी भाषणे ठोकत ज्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याचा टोला आ. तनपुरे यांनी अमोल भनगडे यांचे नाव घेता लगावला. प्रवेश करणार्‍या त्या नेत्याला जलसंपदा मंत्र्यांनी बंद कालवाच होईल, असे सुनावले. परंतु, कालव्यांची कामे बंद पडल्याने त्यांना गप्प बसावे लागले आहे. सरकारचे कायदे हे लोककल्याणासाठी राबविले जातात. परंतु त्याच कायद्याचा गैरउपयोग महसूल विभागात सुरू आहे. गौण खनिज अभावी विकासकामे ठप्प होत असतील. तर असे कायदे बदलण्याची गरज आहे.

शिंदे-फडणवीस शासनाने ग्रामिण भागातील रस्त्यांसह विविध विकासकामांच्या निधीला थांबा देत मोठा अन्याय केला आहे. विकासकामे ही जनसामन्यांसाठी असतात. ते कोणत्याही पक्षासाठी नसतात. परंतु मनामध्ये मळभ घेऊन सत्तेत बसलेल्या भाजप विचाराच्या सत्तेमध्ये सर्वसामान्य होरपळला जात आहे. दिवसेंदिवस जनतेचा संताप वाढत चालला आहे. सत्तांतर होणार हे निश्चित झाले आहे. आगामी तीन ते चार महिन्यामध्ये शिंदे-फडणवीस शासन कोसळणार असून महाविकास आघाडी शासनाच्या सत्ता येणार असल्याचा ठाम विश्वास आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला.

गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्यांकडून काय अपेक्षा

राहुरीचे माजी आमदारांकडून माजी खासदारांच्या मुलाला शिविगाळ करीत मारहाण करण्याची दिलेली धमकीची ऑडिओ क्लिपने माजी आमदार कर्डिले यांच्या गुन्हेगारीला पुन्हा उजाळा दिला आहे. 25 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी कमी झाली नसल्याचे क्लिमधून स्पष्ट होत आहे. केवळ राजकीय द्वेषातून संपविण्याची भाषा करणार्‍यांना सन 2019 मध्ये जशी जनतेने जागा दाखविली तसेच सन 2024 मध्येही जनता पुनरावृत्ती करणार असल्याचा टोला आमदार तनपुरे यांनी लगावला.

SCROLL FOR NEXT