अहमदनगर

नेवासा : गावगाड्याच्या निवडणुकीने राजकीय कुरघोड्या !

अमृता चौगुले

कैलास शिंदे : 

नेवासा : गुलाबी थंडीत ग्रामपंचायत निवडणुकीने नेवासा तालुक्यातील गावपातळीवरील राजकारण चांगलेच तापले आहे. गावनेत्यांनी आपल्या गटात आपल्या कानाखालचे उमेदवार उभे करून अनेकांना शेवटपर्यंत शब्द देवून झुलवित ठेवले. आपल्या मर्जीतील ताफा गावपातळीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच होण्यासाठी सज्ज करून मतदारांची राजीखुशी राखत विजयाची बाजी मारण्यासाठी राजकीय रणांगणात डावपेच आखले जात आहे. यामुळे गुलाबी थंडीत गावकुसाचे राजकारण चांगलेच तापले आहे. गावपातळीवर राजकीय सोंगट्या फिरविण्यात स्थानिक नेते व्यस्त आहेत. कुरघोड्या वाढल्याचे चित्र दिसत आहे.

निवडणूक म्हटले की, राजकारण आलेच. एरवी ऐकमेकांशी गुण्यागोविंदाने नांदणारे ग्रामस्थ गावच्या निवडणुकीत ऐकमेकांचे पॅनल बदलले असल्याने एकमेकांशी बघूनही कानाडोळा करताना दिसून येत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवांराची कमजोरी आणि राजकीय आडाखे ओळखून फुगण्या लावण्याचे काम परस्पर विरोधी उमेदवारांचे बगलबच्चे सध्या गावपातळीवर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे राजकारणातील डावपेचांनी चांगलेच राजकारण तापले आहे.

नेवासा तालुक्यातील राजकीय द़ृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणार्‍या माका ग्रामपंचायत निवडणुकीत तीन पॅनल निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. तर, सरपंचपदासाठी ऐनवेळी शब्द देवून उमेदवारी न दिल्यामुळे पप्पू पेटेकर याने सरपंचपदासाठी अपक्ष उमेदवारी करून नशिब अजमावत आहे. माका गावचा या निवडणुकीत आदर्श घेण्याची परंपरा कायम ठेवत सर्वच उमेदवार ऐकमेकांशी गुण्यागोविंदाने वागत असून, एकमेकांशी चहापान करत असल्याने येथे राजकारण केवल नवडणुकांपुरते ग्राह्य धरले जाते. यामुळे या गावचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज असल्याचे मत जाणकारांतून व्यक्त होताना दिसते.

सरपंचपदासाठी अपक्ष रिंगणात !

माका गावात तीन पॅनल ऐकमेकांसमोर उभे ठाकलेले असताना पप्पू पटेकर युवकाला शेवटच्या क्षणी उमेदवारी न दिल्यामुळे सरपंचपदासाठी युवकाने अपक्ष उमेदवारी केली.

नमस्कार-चमत्काराने मनधरणी

सध्या ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराडा पेटल्यामुळे प्रत्येक गावात माणुसकीला उधाण आलेले असून, नमस्कार-चमत्कार करून मतदारांची मनधरणी केली जात आहे. अडचणीला हातभारही लावला जात आहे. परिसरातील सर्वच व्यावसायिकांचे धंदे जोमात सुरू असून, ढाब्यावर गर्दी होत आहे. मद्यपींकडून तिकडे नमस्कार करून आपला खर्च भागवून घेत डाव साधून घेत असल्याचे दिसून येते. प्रचाराच्या पहिल्याच दिवसात माणुसकीला उधाण आलेले असल्याचे दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT