अहमदनगर

नगर : 98 टक्के मतदान शिक्षक बँक कोणाची; आज निकाल

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँकेच्या 21 संचालकांच्या निवडीसाठी 10 हजार 233 मतदारांनी रविवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 98 टक्क्यांवर पोहचल्याने निकालाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान निवडणूक रिंगणातील चारही प्रमुख मंडळांकडून विजयाचा दावा केला जात आहे. आज सोमवारी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीस सुरूवात होणार असून सायंकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहे. शिक्षक बँक नेमके कोणाची याचा फैसला आज सोमवारी होणार आहे.

शिक्षक मतदार असलेल्या बँकेच्या निवडणुकीतही ग्रामपंचायत निवडणुकीसारखेच 'सोधा', क्रॉस व्होटिंगसोबतच मतदारांची पळवापळवीही पहावयास मिळाली. पळवापळवीमागे 'लक्ष्मीदर्शन'ची चर्चा वर्तुळात ऐकू आली. शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी 30 केंद्रांवर किरकोळ शाब्दीक चकमक वगळता शांततेत मतदान झाले. सत्ताधारी मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे, गुरुकुलचे नेते डॉ. संजय कळमकर, रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊलीचे नेते विकास डावखरे आणि सदिच्छा मंडळाचे नेते राजेंद्र शिंदे यांनी सर्वप्रथम आपापल्या केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला.

रोहोकले गुरुजी, सलीम पठाण, साहेबराव अनाप, किसनराव खेमनर, अविनाश निंभोरे, एकनाथ व्यवहारे, आबासाहेब जगताप, शरद वांढेकर, बाळासाहेब कदम यांनी जिल्हाभरातील केंद्रांना धावत्या भेटी देवून हालहवाला घेतला. दरम्यान, मतदान केंद्रात गेलेल्या शिक्षकांना मतदान करताना लागणारा वेळ पाहता क्रॉसव्होेटींग झाल्याची चर्चा आहे. त्याचा फटका कोणाला, नाराजांची मते कोणाच्या पारड्यात याबाबत सर्वच मंडळांकडून मंथन सुरू होते.

आम्ही सभासद हिताचा कारभार केल्याने ही निवडणूक सभासदांनीच हातात घेतली होती. त्यामुळे पुन्हा एकदा बँकेची सत्ता सभासद पारदर्शी, स्वच्छ कारभारासाठी आमच्याकडेच देतील, याचा विश्वास आहे.
                                                     -बापूसाहेब तांबे, गुरूमाऊली 2015

आम्हाला निवडणुकीत सामान्य शिक्षक सभासद बांधवांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता विजयाचा प्रचंड आत्मविश्वास आहे. मात्र, शेवटी जनता जनार्धन आहे. हेही विसरून चालणार नाही.
                                                    -रावसाहेब रोहोकले, प्रणित गुरूमाऊली,

करेक्ट कार्यक्रम कोणाचा?
मतदान केंद्रांवर येणारा शिक्षक सभासद हा सर्वच उमेदवारांना हस्तांदोलन करत होता. तसेच अनेकांच्या गळाभेटीही घेताना दिसला. मात्र, प्रत्यक्षात आत जावून या मतदार शिक्षकांनी नेमके कोणाचे 'काम' केले, याविषयी खुद्द उमेदवारही गोंधळलेले दिसून आले. आजच्या निकालातूनच सभासदांनी कोणाचा करेक्ट कार्यक्रम केला, हे समजणार आहे.

विकास मंडळाला 94 टक्के
विकास मंडळाचे 10 हजार 738 मतदार आहेत. यापैकी काल 10 हजार 173 मतदारांनी मतदान केले. 94 टक्के हे मतदान झाले आहे. बँकेचे मतदान झाल्यानंतर विकास मंडळासाठी मतदान केले जात होते. मात्र, विकास मंडळाच्या बूथवर नियोजन नसल्याने गर्दी होती. त्यामुळे अनेकांनी बँकेचे मतदान झाल्यावर थेट घरचा रस्ता पकडला.

पाच तालुक्यात आम्ही आघाडीवर राहू, अन्य तालुक्यांतूनही चांगले मते पडतील. त्यामुळे विजयाची आम्हाला खात्री आहे. सभासदांनी दाखवलेला विश्वास निर्णायक ठरणार आहे.
                                              -संजय कळमकर, गुरुकल मंडळ,

सदिच्छा आघाडीच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मते टाकली. सभासदांच्या विश्वासामुळे सत्ता मिळाली, तर आम्ही स्वच्छ आणि पारदर्शी कारभार तसेच सभासदहित काय असते, हे दाखवून देऊ.
                                                   -राजेंद्र शिंदे, सदिच्छा आघाडी

3200 मते मिळविणार घेणार गुलाल
गतवेळेस विजयासाठी 4200 आसपास मते हवी होती. यंदा चार मंडळे निवडणूक रिंगणात असल्याने मतविभागणी होऊन विजयासाठी 3200 च्या आसपास मते आवश्यक असल्याची आकडेमोड मंडळांच्या प्रमुखांनी केली. नेवासा, अकोले, संगमनेर, श्रीगोंदा येथे निर्णायक मते आहेत. त्यामुळे या चार तालुक्यात जे मंडळ आघाडी घेईल ते सत्तेवर येईल, असा दावा केला जात आहे.

निर्णायक कोण…स्वराज्य, शिक्षक भारती की इब्टा !
मागील पंचवार्षिक निवडणुकीत रावसाहेब रोहोकले आणि बापूसाहेब तांबे यांच्या गुरुमाऊली मंडळाला 4200 आसपास मते पडली होती. यावेळी हे दोघे स्वतंत्र लढत असल्याने त्यांच्यातील मतविभाजनाचा फायदा गुरुकुलला होणार का?, सदिच्छाचे वाढणारी मते कोणाला फटका देणार, स्वराज्य, शिक्षक भारती आणि इब्टा यापैकी कोणाची मते निर्णायक ठरणार, याची उत्तरे आज निकालातून मिळणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT