अहमदनगर

नगर : मुळा धरणाच्या पाण्यात आढळला मृतदेह

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाच्या चमोरी विश्रामगृहासमोरील पाण्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसून आला. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत मृतदेहाला पाण्याबाहेर काढले. काही तासांपूर्वीच पाण्यात पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगणार कसे? असा प्रश्न विचारत ग्रामस्थांनी सदरची घटना घात की अपघात? याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. मुळा धरणाच्या चमोरी विश्रामगृह हद्दीत पीर बाबाची दर्गाह आहे.

काल (दि.5) रोजी दुपारी 3 च्या दरम्यान, शेळ्या-मेंढ्या पालक छबू बबन पवार यांनी पाण्यात मृतदेह तरंगत असल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ माजी सरपंच अंकूश बर्डे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर इंद्रजित गंगे, सुरेश बर्डे, बाळासाहेब पोपळघट, दीपक नवसारे, अन्वर मौलाना, फिरोज शेख, अमीर शेख, अक्षय मोरे, नितीन साळुंके, अशोक वायसे, आदेश गंगे, विजय मगर आदींनी मुळा धरणस्थळी धाव घेतली.

पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक निरज बोकील, पोलिस हवालदार हनुमंत आव्हाड, वाहन चालक साखरे यांनी घटनास्थळी उपस्थिती होती. पाणबुड्यांनी मृतदेहाला पाण्याबाहेर काढले. संबंधित अज्ञात इसमाच्या खिशामध्ये काही नोटा व चिल्लर अशी रक्कम वगळता इतर कोणताही कागद आढळला नाही. तसेच मृतदेहाच्या डोळ्याला लावलेला चष्माही तसाच होता. मृतदेहाला पाण्याबाहेर येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. परंतु संबंधित मृतदेह दीड ते दोन तासातच पाण्यावर कसा तरंगत आहे? असा प्रश्न उपस्थित करीत ग्रामस्थांनी घटनेबाबत घात की अपघात? याबाबत पोलिसांनी सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

SCROLL FOR NEXT