अहमदनगर

नगर : ‘मोकाट’वरून नगरसेवक भडकले, सभापतींच्या प्रश्नांवर प्रशासन निरुत्तर

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : मोकाट कुत्र्याने चावा घेल्याने नागापूर येथे लहान मुलाचा जीव गेला. कुत्र्याने चावा घेतल्याने नगर शहरात पाच बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मोकाट हिंस्त्र कुत्र्यांच्या बंदोबस्तावरून स्थायी समितीच्या सभेत सभापतीसह नगरसेवक प्रशासनावर भडकले. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासंदर्भात उपायोजना करा, अशा सूचना स्थायी समिती सभापती कुमार वाकळे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. आयुक्तांशी चर्चा करून शास्त्रीय पद्धतीने उपाययोजनेचा निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले. महापालिकेची स्थायी समितीची सभा सभापती कुमार वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक गणेश कवडे, रवींद्र बारस्कर, समद खान, नगरसेविका रुपाली वारे, संध्या पवार, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे यांच्यासह अधिकारी उपस्थत होते.

शहरातील रस्त्यावर आणि सीना नदी कडेला मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या आहेत. मोकाट कुत्रे पकडून नेमके कोठे सोडले जातात. अ‍ॅनिमल वेस्ट रस्त्यावर टाकल्याने कुत्र्यावर त्यावर ताव मारतात आणि हिंस्त्र बनतात. गेल्या काही दिवसांमध्ये पाच जणांचा कुत्र्याने चावा घेतल्याने मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण, हिंस्त्र कुत्र्याला मारणार कोण त्या मुलाच्या कुटुंबियांना मदत करणार कोण असा सवाल सभापती कुमारसिंह वाकळे यांनी उपस्थित केला.

नगरसेवक गणेश कवडे यांनी नालेगाव, काटवन खंडोबा भागातील मोकाट कुत्रे पादचारी नागरिकांना चावा घेत आहेत. दुचाकीस्वारांच्या मागे लागतात. अ‍ॅनिमल वेस्टमुळे कुत्रे चपाती, भाकरी खात नाहीत, परिणामी ते हिंस्त्र बनले आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार, यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी शहरांत 'डॉगबाईट'च्या घटना वाढल्याकडे लक्ष वेधले. कुत्रे मागे लागल्याने अनेकांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे मोकाट कुत्र्यांसंदर्भात ठोस निर्णय घ्यावा. जीव गमवलेल्या मुलाच्या कुटुंबियांना मदत करावी, अशी मागणी केली.

कोंढवाडा विभागप्रमुख हंस यांनी उत्तरादाखल 2001 च्या प्राणीसंरक्षण कायद्याप्रमाणे कुत्र्यांचे फक्त निर्बिजिकरण केले जाते. पैदाशीवर प्रतिबंध करतो मात्र, त्यांना मारण्याची तरतुद कायद्यात नाही. आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे म्हणाले, कायद्यानुसार कुत्र्यांना मारता येत नाही किंवा कायद्यात तशी तरतूद नाही. याबाबत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. त्यात हिंस्त्र कुत्र्यांना शास्त्रीय पद्धतीने बंदोबस्त करण्याबाबत निर्णय घेणयात येईल.

दहा लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी
पावसाळ्यापूर्वी शहरात नालेसफाई करण्यात आली मात्र, काही ठिकाणी पूर्ण काम झाले नाही तर काही ठिकाणी काम करण्यास निधीची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे जास्तीच्या निधीसाठी प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्यास मान्यता देण्यात आली. त्या निधीतून अभियंता कॉलनी येथील नाला, सीना नदी, खोकर नालाची साफसफाई करण्यात येणार असल्याचे उपअभियंता आर. जी. सातपुते यांनी सांगितले.

बाकड्यांचे प्रस्ताव स्थागित
शहरातील 7 व 11 प्रभागांत सार्वजनिक उद्यानामध्ये बाकडे बसविण्यासंदर्भात ऑफिस रिपोर्ट मंजुरीसाठी स्थायी समितीत ठेवण्यात आला. मात्र, त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतला. तीन महिन्यांपासून बाकड्यांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्याला अद्याप मंजुरी नाही. या प्रस्तावाला मंजुरी देणार असाल तर आमच्याही प्रस्तावांना मंजुरी द्यावी, असा अन्य नगरसेवकांनी आग्रह धरला. सभापती कुमार वाकळे यांनी बाकड्याचे दोन्ही प्रस्ताव तुर्त स्थगित करून सर्वच प्रभागांच्या प्रस्तावाबरोबर हे प्रस्ताव मंजुरीसाठी देण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले.

सावेडीचे केडगावात, बोल्हेगावचे मुकुंदनगरात
मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम जोरात सुरू आहे. सावेडीमधील कुत्रे पकडल्यानंतर ते केडगावमध्ये साडले जातात. केडगावचे कुत्रे बोल्हेगावमध्ये सोडले जातात. तर, बोल्हेगावचे कुत्रे मुकुंदनगरमध्ये सोडले जातात. मग संबंधित ठेकेदार कुत्रे पकडून नेमके काय करतो असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला.

छत्रपती संभाजीराजे, आमदार जगतापांचे अभिनंदन
न्यू आर्टस महाविद्यालयासमोरील हुतात्मा स्मारकामध्ये माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या निधीतून दोन मजली इमारत व सुशोभिकरण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांनी बुरूडगाव परिसरातील साईनगरमध्ये म्युझिकल गार्डनसाठी एक कोटी सहा लाखांचा निधी मिळवून दिल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT