अहमदनगर

नगर :  महाआवासमध्ये नगर राज्यात नंबर वन !

अमृता चौगुले

गोरक्ष शेजूळ :

नगर :  जिल्ह्यात घरकुल योजनेला गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ग्रामपंचायत व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सोबत घेवून केलेल्या मायक्रो प्लॅनमुळे अवघ्या 51 दिवसांत 4759 अपूर्ण घरकुले पूर्ण करत नगरने राज्यात पहिल्या स्थानावर झेप घेतली. दरम्यान, धुळे, नाशिक, जळगाव आणि यवतमाळ हे नगरखालोखाल घरे पूर्ण करणारे जिल्हे आहेत.

जिल्ह्यात महाआवास अभियानांतर्गत नगरला दहा पेक्षा अधिक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहेत. मात्र तरीही अपूर्ण घरकुलाचा प्रश्न कायमच होता. नगर जिल्ह्याला सन 2016-17 ते 2021-22 या कालावधीत 61584 इत्तके उद्दिष्ट असून, यापैकी 61455 घरकुले मंजूर आहेत. तर दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजीच्या अहवालात 38327 घरकुलांची कामे पूर्ण होती, तर 22 हजारांपेक्षा अधिक घरे अपूर्ण दिसत होती. त्यामुळे ही आकडेवारी चिंंताजनक असल्याचे निदर्शनास येताच सीईओ येरेकर यांनी एक मोहीमच हाती घेतली.

नगरी पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक
जिल्ह्यात 4759 घरांची कामे पूर्ण झाल्याचा कागदोपत्र अहवाल असला, तरी ही कामे खरच झालेली आहेत का, हे पाहण्यासाठी तसेच पुढील टप्प्यात आणखी अपूर्ण घरकुलांच्या कामांचे नियोजन करण्यासाठी सीईओ येरेकर हे पुन्हा एकदा 14 तालुक्यांच्या मोहिमेवर जाणार असल्याचेही प्रशासनाकडून समजले. त्यामुळे येणार्‍या कालावधीत सीईओंचा नगरी पॅटर्न ग्रामीण विकास यंत्रणेसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

तालुकानिहाय दौर्‍यांतून घेतला ग्राऊंड रिपोर्ट !
सीईओ येरेकर यांनी दि. 11 ते 16 डिसेंबर या सात दिवसांच्या कालावधीत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अभियंता किरण साळवे यांना सोबत घेवून थेट 14 पंचायत समित्यांना भेटी दिल्या. पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणेच सीईओंनी एका एका दिवसांतच तीन-तीन तालुक्यांचे दौरे केले. प्रत्येक ठिकाणी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासोबत अपूर्ण कामांचा आढावा घेतला. याशिवाय, कामे पूर्ण करण्यासाठी भेडसावणार्‍या अडचणी, त्यासाठीच्या उपाययोजनांवर त्यांनी सकारात्मक चर्चा केली.

सीईओंची त्रिसूत्री ठरतेय निर्णायक !
तीन टप्प्यात तालुकानिहाय दौर्‍यामुळे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांचे सीईओंनी मनोबल वाढवतानाच तालुका प्रशासनाचे कानही टोचले होते. यात त्यांनी तीन टप्प्यात करायच्या कामांचे नियोजन केले. त्यासाठी वेगवेगळ्या तारखांचा अल्टिमेटमही दिला. यात 20 डिसेंबरपर्यंत ज्या घरकुलांना मंजुरी मिळालेली नाही, त्यांना मंजुरी देणे, दि.25 डिसेंबरपर्यंत नव्याने मंजुरी दिलेल्या घरकुलांची कामे सुरू करणे, आणि 31 डिसेंबरपर्यंत तिसर्‍या टप्प्यासह पत्रा लेव्हलवर अपूर्ण अवस्थेत असलेल्या घरकुलांची कामे पूर्ण करणे, यासाठी कोणतेही कारणे चालणार नाही, असा सज्जड दमही भरला होता. त्यामुळे गटविकास अधिकारी, ग्रामसेवकही खडबडून जागे झाले अन कामांना वेग आला.

शेवटचे घर पूर्ण होईपर्यंत मोहीम सुरूच !!
सीईओंनी दि. 20 नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या या मोहीमेत काल दि. 11 जानेवारी 2023 पर्यंतच्या 51 दिवसांच्या कालावधीत तब्बल 4759 घरे पूर्ण झाल्याचा अहवाल पुढे आला.त्यामुळे आता जिल्ह्यात 42839 घरे पूर्ण झालेली असून, ही टक्केवारी 70 इतकी आहे. तर अपूर्ण घरांचा आकडा देखील 18 हजारांवर खाली आला आहे. ही आकडेवारी पाहता राज्यात अत्यल्प कालावधीत अपूर्ण घरे पूर्ण करणार्‍या जिल्ह्यांत नगर हा नंबर वन असल्याचे पुढे आले. यापाठोपाठ धुळे 2566, नाशिक 2452, जळगाव 2310 आणि यवतमाळ 1928 घरे पूर्ण करत अनुक्रमे पहिल्या पाचमध्ये आहेत. दरम्यान, शेवटचे घर पूर्ण होईपर्यंत मोहीम सुरूच राहणार असल्याचा निर्धार सीईओंनी बैठकीतून व्यक्त केल्याचे समजते.

कारवाईच्या भीतीने लाभार्थीही धास्तावले !
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी घरकुले अपूर्ण ठेवली आहेत, त्यांच्यावर कारवाई करणे, तसेच ज्यांना घरकुले मंजूर झाली, मात्र त्यांचे काम सुरू केलेली नाहीत, त्यांची घरे रद्द करण्याचा इशारा सर्वच तालुका प्रशासनाने दिला होता. त्यामुळे लाभार्थीही घरकुल बांधण्यासाठी तातडीने पुढे आले.प्रशासनानेही त्यांना सर्वोतोपरी सहकार्याची ग्वाही दिल्याने चार हजारांपेक्षा अधिक घरे पूर्ण होऊ शकली. हा आकडा वाढता असणार आहे.

SCROLL FOR NEXT