अहमदनगर

राहुरी : पोलिस हवालदार भाऊसाहेब आघाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील पोलिस हवालदार भाऊसाहेब आघाव यांच्या आत्महत्येनंतर पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल होऊनही अद्यापी संबंधितांना अटक न झाल्याने आघाव कुटुंबियांनी संताप व्यक्त केला. खाकी वर्दीसाठी आयुष्य खर्च करूनही पोलिसच पोलिसांना न्याय देत नसतील तर खाकी वर्दीची विश्वासार्हता राखणार कोण, असा संतप्त सवाल आघाव स्व. यांच्या नातलगांनी केला. मृत पोलिस कर्मचारी आघाव यांचा मुलगा प्रेमकुमार भाऊसाहेब आघाव यांनी फिर्याद देत स. पो. नि. साबळे, ए. एस. आय. निमसे, महिला पोलिस कर्मचारी व शिवाजी फुदे (भाऊसाहेब) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह 10 लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक दराडे हे तपासी अधिकारी आहेत. त्यांनी तत्काळ आरोपींना पकडण्यास पथक रवाना केल्याचे सांगितले, परंतु आरोपी अजुनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. अकोले तालुक्यातील राजूर पोलिस ठाण्यात आघाव यांच्यावर दाखल विनयभंगाचा गुन्हा खोटा असल्याचे सांगुनही आघाव यांना कोणीच न्याय दिला नाही. या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे गरजेचे होते, परंतु याउलट आघाव यांनाच त्या प्रकरणी मानसिक त्रास देण्यात आला. स्व. आघाव यांना खंडणी मागितल्याचा सुसाईड नोटमध्ये खुलासा झाल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून तडकाफडकी अ‍ॅक्शन गरजेचे होते. पोलिस हवालदार आघाव यांच्या आत्महत्येनंतरही पोलिस प्रशासनाने घेतलेले शांततेचे धोरण पाहता 'दाल मे कुछ काला है,' अशी संतप्त चर्चा दबक्या आवाजात होत आहे.

दरम्यान, बीड येथील माजी पो. ह. नामदेव लोंढे प्रतिक्रीयेत म्हणाले, उच्च न्यायालयाने मॅटमध्ये सुनावणी सुरू असताना पोलिसांने निर्णय घेऊ नये, असा आदेश दिला, परंतु याकडे दुर्लक्ष करीत निर्णय घेण्यात आले.

पोलिसांकडून सलामी, मानवंदना..!
पोलिस खाकी परिधान केलेली असतानाच आघाव यांनी आत्महत्या केली. पोलिसांकडून सलामीच्या मानवंदना देत रात्री 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. डि. वाय. एस. पी. संदीप मिटके, पो. नि. प्रताप दराडे यांनीही मानवंदना दिली. आ. प्राजक्त तनपुरे यांनी शोक व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली.

संशयित पसार झाल्यानंतर गुन्हे दाखल!
सकाळी 9 वाजेच्या सुमारास आत्महत्येचा प्रकार समोर आला. मृत पोलिस कर्मचारी आघाव यांनी व्हॉट्रसअ‍ॅपद्वारे चिठ्ठी पाठवली. त्याचवेळी आरोपी पकडणे गरजेचे होते, परंतु पोलिसांनी दिरंगाई करीत आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप मृत आघाव यांचे कुटुंबिय व नातेवाईकांनी केला.

माझ्या वडिलांनी पोलिस खात्यात नोकरी करताना आम्हाला कधीच वेळ दिला नाही. 'मला ड्युटी महत्वाची आहे, असे सांगत त्यांनी नेहमी कामाला महत्व दिले. पोलिसात असुनही कोणत्याही पोलिसांनी त्यांना साथ दिली नाही.
– प्रेम आघाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT