प्रातिनिधिक छायाचित्र. 
अहमदनगर

अबब.. खात्यावर 40 लाख ! ब्राम्हणी येथील ग्रीनअप कंपनीच्या बँक खात्यात ऑनलाईन आलेली रक्कम केली परत

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : अचानक तुमच्या बँक खात्यावर तब्बल 40 लाख रुपये जमा झाल्याचा मोबाईलवर मेसेज आला तर..? तुम्हाला कुणाकडूनही येणे नाही, कुणाकडे बाकी नाही, तुम्ही कुणाकडे पैशाची मागणी केली नाही, तरीही तुमच्या बँक खात्यावर अचानक 40 लाख रुपये जमा झाले तर..? होय, हे खरं आहे!  राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे कृषी क्षेत्रात काम करणार्‍या ग्रीनअप कंपनीच्या बँक खात्यात (दि.30 डिसेंबर 2022) रोजी सायंकाळी अचानक 40 लाख 48 हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज मुख्य कार्यकारी संचालक सचिन ठुबे यांच्या मोबाईलवर आला. जमा रकमेबाबत शंका वाटल्याने सचिन ठुबे यांनी बँकेत चौकशी केली की, ही रक्कम कशाची जमा झाली? कुणी पाठविली? आपल्याला कुणाकडून येणे नाही, मग रक्कम आली कोठून? रक्कम आली, पण खाते उतार्‍यावर जमा नोंदीत डिटेल्स काहीही नाही, असे अनेक प्रश्न यानंतर निर्माण झाले.

त्यामुळे सचिन ठुबे यांनी बँकेला हे 40 लाख रुपये माझे नाही,' असे कळविले. सोबत राहुरी पोलिसांना देखील या प्रकाराची लेखी माहिती दिली. शोध घेऊन ही रक्कम ज्याची असेल त्याला परत करा, कुणावर अन्याय व्हायला नको,' असे, सांगितले, परंतु 31 डिसेंबरचा मंथ एन्ड, शनिवार, रविवार सुट्टी असल्याने या रकमेबाबत अधिक तपशील उपलब्ध होत नव्हता. अखेर सोमवारी म्हणजे 2 जानेवारीला (Central plan scheme monitoring system) कडून ही रक्कम जमा झाल्याचे बँकेने जाहीर केले. आता ही संस्था नेमके काय काम करते, तिने कशाची रक्कम जमा केली, हे कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे झालेला प्रकार पुन्हा सचिन ठुबे यांनी राहुरीचे पोलिस निरिक्षक मेघशाम डांगे यांना कळविला.

दरम्यान, राहुरी पोलिसांनी देखील याचा तपास सुरु केला. पोलिसांच्या मदतीने अधिक तपशील उपलब्ध झाल्यानंतर सचिन ठुबे यांनी केंद्रीय पातळीवरील त्या संस्थेशी संबंधित पुण्यातील कार्यालयाला स्वतःहून संपर्क केला. अधिकार्‍यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पुण्यातील अधिकार्‍यांनी झालेला प्रकार वरिष्ठ कार्यालयाला कळविला. झालेली चुक निदर्शनास आणून दिली. यानंतर संबंधित अधिकार्‍यांनी तातडीने या प्रकरणाची माहिती घेऊन, अकाऊंट नंबर चुकल्याने ही रक्कम अनावधानाने तुमच्या खात्यात जमा झाली आहे असे कळवले.

अखेर जमा झालेली रक्कम परत करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रीया बुधवारी 4 जानेवारी रोजी पूर्ण झाली अन् कार्यालयातील अधिकार्‍यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. कार्यालयातील अधिकार्‍यांनी सचिन ठुबे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करीत आभार मानले. सचिन ठुबे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, तहसीलदार एफ.एस शेख, पोलिस निरिक्षक मेघशाम डांगे यांच्यासह अनेकांनी फोनकरून तसेच प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले.

अनावधानाने झालेल्या ह्या प्रकाराची माहिती वार्‍यासारखी पसरली. अनेकांनी नको तो सल्ला देखील दिला. अनेकांनी फोनवरून संबंधित उद्योजकाकडे चौकशी देखील केली, परंतु आपण काय कमवायचं ते प्रामाणिकपणे कमवू, फुकटचा पैसा आपल्याला नको, ज्यांची कुणाची ही रक्कम असेल त्या एखाद्या निष्पाप व्यक्तीवर अन्याय होऊ नये, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे.

                                                                              – सचिन ठुबे

ग्रीनअप कंपनीच्या खात्यावर अनाहूतपणे रक्कम जमा झाल्याचा अर्ज प्रशासनाला प्राप्त झाला होता त्याचा गुंता सुटला आहे. स्वतःहून पुढे येऊन प्रामाणिकपणा दाखवणार्‍या सचिन ठुबे यांचे आम्हाला कौतुक आहे.
                                                     – मेघशाम डांगे, पोलिस निरीक्षक, राहुरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT