जामखेड : घरासमोरील रस्त्यावर खेळत असलेल्या परी लखन गायकवाड (रा .खर्डा) या तीन वर्षीय चिमुकलीचा टेम्पोच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही हळहळ करणारी घटना जामखेड तालुक्यातील खर्डा या ठिकाणी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि.25) दुपारी जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुर्वे गल्ली जवळ परी लखन गायकवाड ही तीन वर्षाची चिमुकली रस्त्याच्या बाजूला खेळत होती. यावेळी अचानक खर्डा बस स्थानकाकडून सुर्वे गल्लीकडे रत्नसुरेश कॉम्प्लेक्सच्या रस्त्याने पाण्याचा टॉम्पो जात असताना सदर चिमुकलीस धडक दिली व ही चिमुकली या टेम्पोच्या चाकाखाली चिरडली गेली. यामध्ये तिचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर अपघातास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत टेम्पो चालक हा त्या ठिकाणावरून फरार झाला होता.
सदर मुलीस डॉक्टर बिपिन लाड यांनी आपल्या ॲम्बुलन्स मधून जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणले होते. मात्र पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. यानंतर सायंकाळी पाच वाजता मयत मुलीचे जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चिमुकलीच्या मृत्यूने खर्डा व परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.