अहमदनगर

तिसगावात शिक्षणासाठी येणार्‍या ‘ती’ची छेड ! घटनांमध्ये मोठी वाढ

अमृता चौगुले

करंजी; पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील तिसगावात शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण परिसरातून अनेक मुली येतात. या मुली शिक्षणाच्या आशेपोटी आपल्या घरापासून दूर येतात. परंतु, इथे आल्यानंतर त्यांच्या समवेत वेगळेच घडते. गावातील टारगट मुले त्यांची येता-जात छेड काढतात, इतक्यावरच ते थांबत नाही तर, घरापर्यंत काही मुलींचा पाठलागही करतात. घरचे कोणी आलेच तर त्यांनाही दमबाजी केली जाते.

तालुक्यातील शिरापूर घाटशिरस, देवराई, मांडवे, जवखेडे, सोमठाणे, कडगाव, निवडूंगे, जोडमोहोज, निंबोडी, आठरे कौडगाव येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. बाहेरून येणार्‍या विद्यार्थिनींची तिसगावमधील काही टवाळखोरांकडून दूरवर पाठलाग करून छेड काढण्यात येते. असाच प्रकार सोमवारी काही विद्यार्थिनींबरोबर झाला. विद्यार्थिनींच्या कुटुंबातील व्यक्तींनी तिसगावमध्ये येऊन छेड काढणार्‍या तरुणांना जाब विचारताच त्यांनी त्यांना मारहाण केली.

याबाबत खंडू हिराजी बुधवंत यांनी पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादित म्हटले की, सोमवारी सकाळी गावातील काही मुली शिक्षणासाठी तिसगावमध्ये आल्या होत्या. या ठिकाणी या मुलींची तिसगावातील काही टवाळखोरांनी छेड काढली. यानंतर सायंकाळी चार वाजता बुधवंत व त्यांचे नातेवाईक पवार यांनी महावीर चौकात उभ्या गणेश शिंदे व आशिष साळवे याला विचारले, 'तुम्ही मुलींना शाळेत जाता-येता त्रास का देता, त्यांना त्रास देऊ नका, समजून सांगताना त्या दोन्ही तरुणांनी खंडू बुधवंत यांना जबर मारहाण केली.

यानंतर बुधवंत यांनी त्या दोघांविरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तिसगावात बाहेरून मुली शिक्षणासाठी येतात; परंतु गावातील अनेक टवाळखोर या मुलींचा त्यांच्या घरापर्यंत पाठलाग करतात अन् त्यांची छेड काढतात. अशा घटना वारंवार तिसगावमध्ये घडत आहेत. याबाबत विद्यालय प्रशासन ही हतबल झाले आहे.

शिक्षण अपूर्ण राहण्याची मुलींना भीती
शाळेत येता-जाता तरुणांकडून सातत्याने होणारी छेडछाड, होनारा मानसिक त्रास घरी सांगितलं तर शाळा बंद होईल, आपले शिक्षण होणार नाही, या भीतीने अनेक मुली घरी सांगत नाहीत. याचाच फायदा घेऊन या तरुणांचे धाडस वाढले आहे. तरुणांकडून होणारी छेडछाड सहन न झाल्याने काही तरुणींनी जीवन संपवल आहे. यामुळे आणखी किती मुलींनी आपले जीवन संपवल्यानंतर या घटनांना कायमचा आळा बसेल, असा संतप्त सवाल नागरिकांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT