अहमदनगर

शिक्षकांची ‘अतिरिक्त’ची भीती तूर्त टळली ; आधार नोंदणीला मुदतवाढ

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शाळांनी अद्याप साडेतीन लाख विद्यार्थ्यांची आधार माहिती विद्यार्थी प्रणालीवर नोंदवलेली नाही. त्यामुळे ते विद्यार्थी बोगस असल्याचे गृहीत धरून संच मान्यतेत जवळपास 13 हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 30 एप्रिलची मुदत संपल्यानंतर अनेकांची चिंता वाढली आहे, पण त्या कामासाठी आता अंदाजे 30 जूनपर्यंत मुदतवाढ राहील, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली. तशी मागणी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार असणे बंधनकारक आहे. नाव, लिंग, जात, अशा चुकांची दुरुस्ती देखील करणे आवश्यक असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. आता आगामी संच मान्यतेसाठी आधार क्रमांक व अचूक माहिती असलेलेच विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शाळांना 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती.

तत्पूर्वी, 15 एप्रिलपर्यंत मुदत होती. मात्र, संकेतस्थळाच्या सर्व्हरला नेटवर्कचे अडथळे आणि स्लो मोडमुळे अनेकांना वेळेत काम करता आले नाही. त्यातच आता शाळांना सुटी लागली आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावरच उर्वरित काम करावे लागणार आहे, असे शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, महेश पाडेकर, योगेश हराळे, संभाजी पवार, संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख, विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी सांगितले.

'अतिरिक्त'चा निर्णय सहजपणे नाहीच
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 35 हजारांवर तर खासगी अनुदानित शाळांमध्ये जवळपास 27 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील 50 टक्के पदांची भरती काही दिवसांतच सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्येक जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावरच भरती प्रक्रिया राबवायची आहे. परंतु, आधारकार्ड नाही किंवा आधारवरील माहितीत त्रुटी आहेत म्हणून सध्या कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याचा निर्णय सहजपणे व तत्काळ घेणे डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यासाठी मुदतवाढ मिळेल, असेही सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT