नेवासा, पुढारी वृत्तसेवा: अखेर तालुक्यातील मडकी येथील प्राथमिक शिक्षकाची बदली होऊन कारवाईच्या मागणीसाठी पालक व ग्रामस्थांनी सोमवारी नेवासा पंचायत समितीसमोर उपोषण केले. गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकार्यांनी शिक्षकाची बदली केल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. तालुक्यातील मडकी येथील प्राथमिक शिक्षक बद्रीनाथ चव्हाण या शिक्षकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालक व ग्रामस्थांनी वेळोवेळी गट शिक्षणाधिकार्यांकडे लेखी तक्रारी केलेल्या होत्या. परंतु कोणत्याही हालचाली झाल्या नाही. नेवाशातीलच शिक्षण विभाग या बेजाबदार शिक्षकाला पाठिशी घालत असल्याचा आरोप नागरिकांनी निवेदनात केला होता.
त्यामुळेच या शिक्षकावर वरिष्ठांनी उचलबांगडी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. 19) मडकी ग्रामस्थ नेवासा पंचायत समितीसमोर उपोषणास बसले होते. सोमवारी दुपारी 2 वा. उपोषणकर्त्यांची गटविकास अधिकारी संजय दिघे व गट शिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांनी भेट घेऊन चर्चा केली. संबंधित शिक्षकाच्या चौकशीचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आलेला आहे. या शिक्षकाची बदली करण्यात येऊन दुसरा शिक्षक मडकी शाळेला देण्यात आल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलेे. या उपोषणात ज्ञानेश्वर लबडे, किशोर लबडे, अशोक लबडे, पोपट लबडे, गोपीनाथ लबडे, बाळासाहेब लबडे, काकासाहेब लबडे, शेखर लबडे, ज्ञानेश्वर बोडखे, सुनील लोंढे, दशरथ ताकवने आदी सहभागी झाले होते.