अहमदनगर

बँकेने ‘तनपुरे’ ताब्यात घेणे बेकायदेशीर : अ‍ॅड. अजित काळे

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरीचा डॉ. तनपुरे कारखानान सिक्युरीटायझेशन कायद्यांतर्गत जिल्हा बँकेने ताब्यात घेणे बेकायदेशीर असून निवडणूका त्वरीत घेऊन कारखान्याचे संचालक मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर निर्णय होणे गरजेचे आहे. याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी कायदेशिर प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ व शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांनी दिली. राहुरी येथे कारखाना बचाव कृती समिती समवेत आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. काळे यांनी कारखान्याबाबत चालू असलेल्या कायदेशिर लढाई व इतर कामकाजाची विस्तृत माहिती दिली. शेतकरी, कारखाना, कामगार व यावर अंवलबून असलेले सर्व घटक जगले पाहिजे, या शुध्द हेतूने राजकीय कोणताही हेतू न ठेवता आपण ही लढाई लढणार आहोत.

कारखाना अवसायनात गेल्यास तालुक्याच्या विकासात, अर्थकारणात महत्वाची भुमिका असणार्‍या संलग्न संस्था धोक्यात येतील. यासाठी निवडणूक होऊन प्रामाणिक माणसे व्यवस्थापनात आली तर, संस्थाही वाचतील व कारखाना वाचेल. 2014 ला बँकेने सिक्युरीटायझेशन नुसार कारवाई केली. त्यावेळील संचालक मंडळाने डीआरटी न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्वरीत स्थगिती दिली गेली. परंतू, शासनाने कलम 78 अंतर्गत कारवाई करून तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली.

तत्कालीन प्रशासकाने 2016 साली डीआरटी न्यायालयाची याचिका काढून घेतली हीच मोठी बेकायदेशिर गोष्ट असून त्यानंतर बँकेने कारखाना ताब्यात घेतला. कारखान्याची निवडणूक होऊन त्यानंतर आलेल्या संचालक मंडळाकडून वैयक्तिक व सामुहिक हमी स्टँप पेपरवर घेऊन बँकेने कर्जाचे पुर्नगठण केले होते. त्यानुसार बँकेने संचालक मंंडळाला याबाबत जबाबदारी निश्चितीची नोटिस ही काढली. परंतू राजकिय दबावाने पुन्हा ही जबाबदारी कारखान्यावरच असल्याची नोटीस बँकेने काढली. 25 वर्षाच्या भाडेतत्व कराराला प्रतिसाद दिसत नाही. त्यातून वेळकाढूपणा करून राजकिय परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा येथे येऊन बसण्याचा काहींचा मनुसुबा असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

कारखाना वाचविण्यासाठी न्यायालयीन लढाई बरोबर रस्त्यावरच्य लढाईतही आपण बरोबर राहू. कारखान्याच्या निवडणूकीसाठी सर्वसामान्य शेतकर्‍यांकडून 36 लाख रूपये निवडणूक निधी उभा करावा लागेल.अरूण कडू म्हणाले, विखेंनी गणेश व डॉ. तनपुरे कारखान्यासाठी काहीच न करता फक्त लूट केली. दोन्ही कारखान्याकडे आमचेच कोट्यावधी रुपयांचे येणे असल्याचा कांगावा केल्याचा आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी निवडणुकीतून समाविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हे गौडबंगाल बाहेर काढावे लागेल. असे आवाहन केले.

यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. रावसाहेब करपे यांनी विविध कायदेशिर बाबी समजावून सांगीतल्या. कारखाना बचाव कृति समितीचे अमृत धुमाळ, राजूभाऊ शेटे आदींनी प्रास्तविकातून कायदेशिर व इतर लढाई बाबत माहिती दिली. यावेळी अ‍ॅड. पंढरीनात पवार, बाळासाहेब गाडे, सुखदेव मुसमाडे, विजय कातोरे, भगवान गडाख, मधूकर तारडे, कारभारी ढोकणे, अशोक ढोकणे, बाळासाहेब आढाव उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT