अहमदनगर

चोरांचा नवा फंडा, प्रवाशांना गंडा ! बसस्थानकात दोन दिवसांत तीन घटना

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील पुणे बसस्थानकामध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांची दागिने लांबविली जात आहेत. गेल्या चार दिवसांत महिलांचे दागिने लांबविल्याच्या तीन घटना घडल्या. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे स्वास्तिक चौकातील पुणे बसस्थानक चोरांचा अड्डा बनले असून, पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. शहरातील माळीवाडा बसस्थानक, स्वास्तिक चौकातील पुणे बसस्थानक व तारकपूर बसस्थानक येथे बसमधून दागिने व रोकड चोरीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, तत्कालीन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव असताना त्यांनी बसस्थानकावर चोरी करणारी महिलांची टोळी पकडली होती. तर, शिर्डी पोलिसांनी बसमध्ये चोरी करणारी महिलांची टोळी पकडली होती. त्यामुळे मधल्या काळात बसमध्ये चोरी होण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, गेल्या तीन ते चार दिवसांपासून बसस्थानक परिसरात चोरी करणार्‍या टोळी सक्रीय झाल्या आहेत. कोतवाली पोलिस ठाण्यात दोन दिवसांत तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

तीन ही घटनाची हकिगत सारखीच आहे. पुण्याला जाण्यासाठी थांबलेल्या महिला प्रवाशी बसमध्ये चढत असताना अचानक त्याच्या गळ्यातील बॅगमधील दागिने चोरीला जात आहेत. काही समजण्याच्या आत सोन्याचे दागिने, रोकड लांबविली जात आहेत. त्यामुळे बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोतवालीला हवी स्मार्ट पोलिसिंग
कोतवाली पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी शस्त्राचा धाक दाखवून एकाला लुटणारी टोळी पकडली. त्याच धरर्तीवर माळीवाडा बसस्थानक, पुणे बसस्थानावर स्मार्ट पोलिसिंग होणे आवश्यक आहे. जेणे करून चोरीच्या घटनांना आळा बसले. त्यामुळे दोन्ही बसस्थानकावर महिला पोलिसांची गस्त आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

91 हजार 500 दागिने चोरले
पुण्याला मुलाकडे जाण्यासाठी निघालेल्या महिलेच्या पर्समधील दागिने व दीड हजार रुपये रोख असा ऐवज मंगळवारी दुपारी स्वास्तिक चौकातील बसमध्ये चढत असताना कोणीतरी चोरला. त्यात तीन तोळे सोने व दीड हजारांची रोकड होती. याबाबत सुनीता रभाजी मेहेत्रे (रा. अकोळनेर, ता. नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

हेरगिरी करून दागिने, रोकड लंपास
पुणे, औरंगाबाद, नाशिकला जाणार्‍या बसमध्ये प्रवासी म्हणून बसायचे. बस नगरमधून पुढे निघाल्यानंतर चहा व नाष्ट्यासाठी थांबते. तिथे प्रवाशी खाली उतरल्यानंतर हेरगिरी करून प्रवाशांचे दागिने व रोकड बॅगमधून काढून तिथेच खाली उतरायचे. बस पुढे निघाल्यानंतर त्या प्रवाशांच्या लक्षात येती की बॅगमधील दागिने चोरी झाले आहेत. मात्र, तोपर्यंत बराच काळ झालेला असतो. चोर निघून गेलेला असतो. त्यातील काहीजण पोलिस ठाण्यात येऊन तक्रार देतात. तर, काही जण तक्रार देण्यासाठीही येत नाही.

बसस्थानकावरील चोर्‍या रोखण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली असून, शोध मोहीम सुरू आहे. तसेच, बसस्थानकवर सीसीटीव्ही कॅमेरे असून, कॅमेरेसमोर बस उभी रहावी यासाठी बॅरिकेटिंग केली आहे.
                                                  – प्रताप दराडे, पोलिस निरीक्षक कोतवाली 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT