राहुरी, पुढारी वृत्तसेवा: पतसंस्था चळवळीत संस्थेची इमारत, ठेवी, उलाढाल किती मोठी आहे. यापेक्षा सामान्य जनतेला किती आधार दिला, याला महत्त्व आहे. प्रेरणा पतसंस्था मल्टीस्टेट संस्थेतर्फे ग्रामीण भागातील सामान्य व्यावसायिक, शेतकर्यांना दिलेला आधार प्रेरणा देणारा असल्याचे भारत सरकारच्या सहकार संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी सांगितले.
गुहा येथे प्रेरणा पतसंस्था, प्रेरणा मल्टीस्टेट व प्रेरणा सोसायटीला प्रभू यंनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे होते. याप्रसंगी प्रेरणाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, उपाध्यक्ष विष्णुपंत वर्पे, मच्छिंद्र हुरुळे, अशोक उर्हे, एस. एस. गडगे, सनदी लेखापाल महेश तिवारी, सुरेश डौले, सरपंच उषा चंद्रे, उपसरपंच रवींद्र उर्हे, व्यवस्थापक गोरक्षनाथ चंद्रे, अनिल वर्पे उपस्थित होते.
प्रभू म्हणाले, सहकार चळवळीत उणिवा आहेत. परंतु, ग्रामीण भागाचा विकास खर्या अर्थाने सहकार चळवळीमुळे झाला. सहकारामुळे तळागाळातील सामान्य माणसाचे, शेतकर्यांचे जीवनमान उंचावले आहे. पतसंस्थांमुळे सावकारांचा विळखा ढिला झाला. चांगले नेतृत्व लाभलेल्या संस्था मोठ्या झाल्या.
नगर जिल्ह्यात सहकारातील डॉ. दादासाहेब तनपुरे, पद्मश्री विखे-पाटील असे असामान्य स्वयंभू नेतृत्व निर्माण झाले. त्यामुळे, नगर जिल्हा सहकार क्षेत्रात देशातील आदर्श जिल्हा ठरला आहे. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी केले. प्रा. वेणुनाथ लांबे यांनी सूत्रसंचालन केले.