अहमदनगर

कुकाणा : विद्यार्थ्यास टारगटांकडून बेदम मारहाण

अमृता चौगुले

कुकाणा; पुढारी वृत्तसेवा : माझ्या आवडत्या मैत्रिणीशी का बोलला, याचा जाब विचारत भेंडा येथे एका विद्यार्थ्यास शालेय व शालाबाह्य दहा ते बारा टारगट मुलांकडून भरचौकात बेदम मारहाण करण्यात आली. काल हा प्रकार घडला. भेंडा येथे माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालय आहे. या शाळेमध्ये भेंडा व परिसरातील अनेक गावातील विद्यार्थिनी व विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. गुरुवारी (दि.2) शाळेत पेपर संपल्यानंतर देवगाव-रांजणगाव चौकात एका विद्यार्थ्याला काही विद्यार्थी व शाळाबाह्य काही मुलांकडून तिच्यासोबत का बोललास, अशी विचारणा करत बेदम मारहाण करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयातील शंभर ते दीडशे मुले त्या ठिकाणी जमले होते. अशा घटना या महाविद्यालयात कायमच घडत असून, या कॉलेज परिसरात काही शालेय विद्यार्थी, तसेच शाळाबाह्य टारगट मुलांकडून मुलींची छेडछाड करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. परंतु, याची तक्रार आपल्या आई-वडिलांना केली, तर आपण शिक्षणापासून वंचित राहू, आपलं कॉलेज बंद होईल, या भीतीने शाळेतील मुली या टारगटांचा त्रास सहन करत आहेत.

हे टारगट रस्त्यावरील चौकांमध्ये दररोजच टोळक्याने उभे राहून विद्यार्थिनींना अपशब्द वापरतात. अनेक मुलींनी टारगटांच्या भीतीने शाळा बंद केली आहे. टारगटांनी जाणीवपूर्वक मुलींसमोर इतर मुलांना मारहाण केली जाते. या आधी यातील काही विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये शिक्षकांसमोर हाणामार्‍या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून निश्चितच वंचित राहण्याची वेळ येणार आहे. एवढा राडा होऊनही कोणीही पोलिसात तक्रार दाखल करण्याची तसदी घेतली नसल्याने पोलिस देखील हतबल आहेत.

दोन दिवसांत कठोर निर्णय घेणार
शाळेच्या मुलींची छेडछाड होणे, त्याचबरोबर बाहेरगावातील विद्यार्थ्यांना मारहाण होणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. माझ्याकड काही दिवसांपूर्वी तक्रारी आल्या होत्या. परंतु सुधारणा होईल, असे वाटले. परंतु अशा घटना वाढतच आहेत. यावर लवकरात लवकर शिक्षक पालक संघाची बैठक घेऊन कठोर निर्णय घेऊ,असे शिक्षक पालक संघाचे सदस्य सोपान महापूर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT