अहमदनगर

नगरमधूनही जुन्या पेन्शनची मागणी तीव्र !

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत आलेल्या राज्य सरकारी कर्मचार्‍यांसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची जुनी पेन्शनची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जिल्ह्यातील विविध संघटनाही आक्रमक झाल्या असून, दि. 14 मार्चपासून सुरू होणार्‍या राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलनात संबंधित कर्मचारीही सहभागी होण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, शासनाने तोडगा न काढल्यास या आंदोलनात नगर जिल्हा परिषदेचे सहा हजार कर्मचारी सहभागी होऊ शकतात.

गत काही महिन्यांपासून नो पेन्शन, नो व्होट, एकच मिशन, जुनी पेन्शन, अशा स्वरुपाची मागणी कर्मचारी करताना दिसत आहे. पाच जागांवर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीनंतर हा प्रश्न आणखी चर्चेत आलेला आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नी लक्ष घालून जुनी पेन्शन योजना सुरू करावी, यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचे अस्त्र विविध संघटनांनी हाती घेतले आहे. वास्तविकतः राज्यात लाखो कर्मचार्‍यांना नवी अंशदायी पेन्शन योजना लागू आहे.

मात्र, ही पेन्शन योजना भविष्याच्या दृष्टीने अडचणीची असल्याने याविषयी तीव्र नाराजी आहे. त्यामुळे ही नवीन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचार्‍यांची मागणी आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यानही या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी मोर्चा काढला होता. तरीही हा प्रश्न निकाली निघाला नव्हता. आता पुन्हा अनेक संघटनांनी जुन्या पेन्शनसाठी अधिवेशनापूर्वी 14 मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. यात शिक्षक, शिक्षकेतर संघटना, जिल्हा परिषद, महसूल, ग्रामसेवक, कृषी संघटना एकवटताना दिसत आहेत. शासनाने तोडगा न काढल्यास हे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

जुनी पेन्शनप्रश्नी जिल्हा परिषदेच्या संबंधित सर्वच कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपणही त्यांच्यासोबत आहोत. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी, अशी आमची अपेक्षा आहे.
                          -संजय कडूस, चेअरमन, जि.प. कर्मचारी सोसायटी

जिल्ह्यात 450 पेक्षा जास्त तलाठी कर्मचारी सेवेत आहेत. जुनी पेन्शनची आमचीही मागणी आहे. त्यासाठीच्या आंदोलनासंदर्भात लवकरच आम्हाला राज्य संघटनेकडून मार्गदर्शन मिळणार आहे. त्यानुसार दिशा ठरवली जाणार आहे.
                                         -प्रशांत हासे, जिल्हाध्यक्ष, तलाठी संघटना

जुनी पेन्शनसंदर्भात लढा सुरू आहे. आम्ही देखील या आंदोलनात सहभागी होणार आहोत. यासाठी राज्याच्या मध्यवर्ती संघटनेच्या मार्गदर्शनानुसार आणि सूचनांनुसार आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
                       -सोमनाथ बाचकर, जिल्हाध्यक्ष, कृषी सहायक संघटना,

लिपीकवर्गीय कर्मचारीही जुनी पेन्शनसाठी आग्रही आहेत. त्यासाठी 14 मार्चपासून नगर जिल्ह्यातील 850 आणि संपूर्ण राज्यभरातील 16 हजार कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.
                                -अरुण जोर्वेकर, राज्य सचिव, लिपीकवर्गीय संघटना

SCROLL FOR NEXT