अहमदनगर

मोकाट कुत्रे नगरचे अन् गावकर्‍यांना त्रास; महापालिकेने सोडले देहरे गावात

अमृता चौगुले

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर शहरात महापालिकेतफतर्फे पकडण्यात येणारे मोकाट कुत्रे संबधित ठेकेदार संस्थेचे कर्मचारी नगर तालुक्यातील देहरे गावच्या परिसरात आणून सोडतात. या मोकाट कुत्र्यांनी देहरे परिसरात मोठा उच्छाद मांडला आहे. या मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे ग्रामदैवताच्या धार्मिक विधीतही अडथळे येतात. यामुळे ग्रामस्थामध्ये तीव्र संताप असून, देहरे परिसरात मोकाट कुत्रे सोडायचे बंद करा, असे पत्र ग्रामपंचायतने महापालिकेला दिले.

देहरे गाव परिसरात काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक मोकाट कुत्रे आले कुठुन असा प्रश्न गावकर्‍यांना पडला होता. त्यामुळे काही गावकर्‍यांनी याचा सखोल तपास केल्यावर महापालिकेने नगर शहरात मोकाट कुत्रे पकडण्यासाठी नेमलेल्या खासगी संस्थेचा हा प्रताप असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

ग्रामदैवत असलेल्या मालोबा बालोबा व मांगीरबाबा देवस्थानात नेहमी धार्मिक विधी करण्यात येतात. त्यात आवतने या धार्मिक विधीच्या वेळी परिसरात कुठलाही आवाज होऊ नये याची काळजी ग्रामस्थ घेत असतात. काही मोठा आवाज झाल्यास देवाचे आवतने वाया जातात अशी या ठिकाणची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. मात्र, या धार्मिक विधी वेळी मोकाट कुत्र्यांच्या गोंगाटामुळे चार ते पाच वेळा देवाची आवतने फेल झाली आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास ग्रामस्थांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा या पत्रात देण्यात आला.

'तुमचे कुत्रे तुम्ही परत घेऊन जा'

देहरे ग्रामदैवत मालोबा बालोबा व मांगीरबाबा देवस्थानचे भगत सुरेश काळे यांनी पंचायत समिती सदस्य व्ही.डी. काळे व युवा नेते महेश काळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश काळे, किरण लांडगे, अनिल चोर, अजित काळे यांच्याकडे तक्रार केली होती. या सर्वांनी सरपंच हिराबाई करंडे यांना ही बाब सांगितल्यावर त्यांनी तत्काळ ग्रामपंचायतीमार्फत महापालिका आयुक्तांना पत्र दिले असून, महापालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना करत मोकाट कुत्रे देहरे परिसरात सोडू नयेत, तसेच यापूर्वी सोडलेल्या मोकाट कुत्र्यांना पुन्हा पकडून घेवून जावे, असे या पत्रात म्हटले आहे.

महिलांना घराबाहेर पडायला भीती

मोकाट कुत्रे देहरे गाव परिसरात उच्छाद मांडत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र कुत्र्यांचा मुक्त संचार असल्याने लहान मुले, महिलांना घराबाहेर पडायला भीती वाटत आहे.

SCROLL FOR NEXT