अहमदनगर

श्रीरामपूर, राहात्यात वादळाचा तडाखा

अमृता चौगुले

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूरसह राहाता, राहुरी, संगमनेर तालुक्यात आज (रविवारी) दुपारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास साधारण अर्धा ते पाऊण तास सोसाट्याच्या वार्‍याने वेग धरला. यावेळी रस्त्यावरील जनजीवन विस्कळीत झाले. शेतातील माती फुफाटा जोरात हवेत उडू लागल्याने रस्त्यावरील व्यावसायिकांना मोठी अडचण निर्माण झाली.

श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील बेलापूर, दत्तनगर, शिरसगाव, वडाळा महादेव, हरेगाव फाटा, निपाणी वडगाव, खंडाळा येथे वादळाचा तडाखा बसला. रस्त्याच्या कडेचे फलक हवेत उडाले. हॉटेल व्यावसायिकांच्या प्लास्टिकच्या खुर्च्या वार्‍याच्या वेगात इतरत्र उडून पडल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे आढळले. काही वेळाने पावसाची सुरुवात होऊन ठराविक ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. वादळ, वारे जोरात असल्याने बराच वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते.

शहरात रविवारी दुपारच्या वेळी आलेल्या वादळामुळे मेनरोडवरील काही पथदिवे उन्मळून पडले. अचानक झालेल्या घटनेमुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. वादळाच्यावेळी नागरिकांनी रस्त्यावरील दुकानांचा सहारा घेतल्याने सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. शहरासह ग्रामीण भागातही या वादळामुळे झाडे उन्मळून पडली. त्यामुळे अनेक विद्युत खांबांचे नुकसान झाले. या वादळाबरोबर श्रीरामपूरच्या पूर्व भागात पावसाचा शिडकाव झाला.

अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांची चांगलीच धांदल उडाली. अनेक शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी काढलेला होता. या कांद्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. शहरासह बेलापूर रस्त्यावही काही झाडे उन्मळून पडली. पथदिवे उन्मळून पडल्याने शहरातील विद्युत पुरवठा काहीवेळ खंडित झाला होता. परंतु, महावितरणच्या कर्मचार्‍यांनी तातडीने युद्ध पातळीवरी काम केल्याने काही तासातच विद्युत पुरवठा सुरळीत केला.

गोदाकाठ परिसरातील शेतकर्‍यांची एकच धांदल

उत्तरेकडून अचानक आलेल्या वादळी वार्‍याने रौद्र रूप धारण करत पत्रे, झाडांच्या फांद्या पडल्या. कांदा शेडवरील बारदाणा फाटला. काही ठिकाणी झाडे पडल्याने विजेचे खांब अक्षरशः तारेसह आडवे झाले. माळवाडगाव, मुठेवाडगाव शिवारात 15 मिनिटे जोराचा पाऊस पडला. गोदाकाठ परिसरातील शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली.

गोदाकाठ परिसरातील शेतकर्‍यांची एकच धांदल

उत्तरेकडून अचानक आलेल्या वादळी वार्‍याने रौद्र रूप धारण करत पत्रे, झाडांच्या फांद्या पडल्या. कांदा शेडवरील बारदाणा फाटला. काही ठिकाणी झाडे पडल्याने विजेचे खांब अक्षरशः तारेसह आडवे झाले. माळवाडगाव, मुठेवाडगाव शिवारात 15 मिनिटे जोराचा पाऊस पडला. गोदाकाठ परिसरातील शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली.

SCROLL FOR NEXT