अहमदनगर

कर्जतमधील स्टोन क्रशर बेमुदत बंद ; शासनाच्या जाचक अटींना विरोध

अमृता चौगुले

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  शासनाच्या जाचक अटींच्या विरोधात कर्जत तालुक्यातील सर्व स्टोन क्रशर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय तालुका संघटनेने घेतला आहे. तसे पत्र त्यांनी कर्जतचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महावितरण कंपनीला दिले आहे.
कर्जत तालुक्यातील स्टोन क्रशर चालकांचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यात जवळपास 13 ते 14 स्टोन क्रशर आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून शासनाच्या जाचक अटींमुळे सर्वच क्रशर चालक त्रस्त झाले आहेत.

सातत्याने त्यांच्यावर होणार्‍या कारवाया आणि कोट्यवधी रुपये दंड आकारणी झाल्यामुळे, क्रशर चालक संघटनेची बैठक अध्यक्ष रमेश तोरडमल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सर्वानुमते शासनाच्या जाचक अटी जोपर्यंत रद्द करण्यात येत नाहीत, तोपर्यंत सर्व क्रशर बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

संघटनेने क्रशर चालकांचे वीज कनेक्शन बंद करण्यात यावेत, असे लेखी पत्र महावितरण कंपनीला दिले आहे. एवढेच नव्हे तर, तालुक्याच्या बाहेरून जर खडी आणण्यात आली, तर त्यास संघटना तीव्र विरोध करील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
काही नियमात सवलत देऊन क्रशर चालविण्यासाठी परवानगी देण्यात यावी, यासाठी शासनाची रॉयल्टी नियमाप्रमाणे जी आहे ती भरण्यास सर्व क्रशर चालक तयार आहेत. मात्र, हा निर्णय होईपर्यंत सर्व क्रशर बंद ठेवण्यात येणार आहेत. यावेळी दीपक शिंदे, रणजित नलवडे, शेखर गायकवाड, सचिन लाळगे शहाजी देवकर संग्राम पाटील महेश पांडुळे सागर लाळगे अशोक कोठारी विठ्ठल देवकाते उपस्थित होते.

विकासकामे ठप्प होणार

क्रशर संघटनेच्या बेमुदत बंदचा गंभीर परिणाम विकासकामांवर होणार आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांसह बंधारे, शासकीय इमारती, घरकुल योजना, खासगी बांधकामे अशी विविध कामे सुरू आहेत. पावसाळा संपल्यानंतर या सर्व विकासकामांना वेग आला होता. मात्र, आता या क्रशर बंदमुळे मटेरियल उपलब्ध होणार नसल्याने या सर्व कामांवर याचा परिणाम होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT