अहमदनगर

नगर : पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे आढळले ‘स्टेरॉईड’

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  पोलिस भरती प्रक्रियेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरतीसाठी आलेल्या उमेदवारकडून 'स्टेरॉईड'चे इंजेक्शन आढळले असून, भरती प्रक्रियेतील युवक 'स्टेरॉईड'च्या विळख्यात असल्याचे समोर आले आहे. नगरमध्ये पोलिस मुख्यालयाच्या मैदानवरील सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत तात्पुरती उर्जा वाढविण्यासाठी एका उमेदवाराकडे स्टेरॉईडचे इंजेक्शन आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली.

शेख सोहेल शेख सलीम (रा. आझादनगर, मालेगाव, जि.नाशिक), असे 'स्टेरॉईड' आढळलेल्या उमेदवाराचे नाव आहे. हा उमेदवार कुस्ती खेळाशी संबंधित असून, पोलिस भरतीसाठी त्याने अर्ज दाखल केला आहे. नगरमधील पोलिस मुख्यालयाच्या मैदानात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी नगरसह इतर जिल्ह्यांतून तरूण नगरमध्ये भरतीसाठी येत आहेत. पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान धावण्याच्या चाचणीत प्रचंड स्पर्धा असते. त्यामुळे धावण्याची क्षमता वाढविण्यासाठी तरुणांकडून चक्क स्टेरॉईडचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.

सैन भरती असो किंवा पोलिस भरती, या भरतीसाठी अशाप्रकारे इंजेक्शनचा वापर करण्यास मनाई आहे. मात्र, स्टेरॉईडमुळे तात्पुरती उर्जा वाढत असल्याने अशा इंजेक्शचा वापर केला जातो. गुरुवारी (दि.12) भरती दरम्यान एका उमेदवाराकडे मेफेनटरमाईन सल्फेट या कंपनीचे 'स्टेरॉईड'चे घटक असलेले इंजेक्शन आणि तीन सिरिंज आढळून आल्याने खळबळ उडाली.  संबंधित उमेदवाराची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करून रक्त व लघवीचे नमुने पोलिसांनी नाशिक येथे तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती देण्यात आली आहे. वैद्यकीय चाचणी अहवालात 'स्टेरॉईड'चे सेवन केल्याचे आढळून आल्यास संबंधित तरुणावर पुढील कारवाई केली जाणार आहे.

SCROLL FOR NEXT